.

श्रावण महिन्याचे औचित्य साधून ओम श्री शंभो कावड यात्रा उत्सव समितीतर्फे आयोजित कावड शोभायात्रेने भक्तिमय वातावरणाने दुमदुमुन गेला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात निघालेल्या या यात्रेत १५१ कलशांसह महिला-पुरुष, युवक-युवती व ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. महाकाल व अघोरी पथक, खाटूश्याम रथ, आकर्षक धार्मिक देखावे, डमरू-डफळीच्या निनादाने यात्रेने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान सालबर्डी येथील सातपुड्याच्या पायथ्याशी भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी ही कावड यात्रा काढली. उमेश मंत्री व नीलेश रोडे यांच्या हस्ते कलशपूजन करून यात्रेला प्रारंभ केला. भगवे ध्वज, धार्मिक घोषणा, शिवभक्तांचा उत्साह यामुळे शहरातील वातावरण शिवमय झाले होते. छत्रपती शिवाजी चौकात कावड यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.विविध सामाजिक संस्था, व्यापारी संघटना, नागरिकांनी यात्रेवर पुष्पवृष्टी करीत शिवभक्तांचे स्वागत केले. गणपती मंदिरात महाआरती झाल्यानंतर यात्रा पुढे मार्गस्थ झाली. गौरक्षण परिसरात ‘मोर्शीचा राजा’ मंडळाने स्वागत केले, तर रामजीबाबा मंदिरात विशेष पूजन व महाआरती केली. यात्रेत भगवान शंकराच्या विविध रूपांचे सादरीकरण केले होते. खाटूश्याम रथाची आकर्षक सजावट, धार्मिक संदेश देणारे देखावे नागरिकांच्या पसंतीस उतरले. अनेक नागरिकांनी या देखाव्यांचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. ‘शिवाय नमस्तुभ्यम’, ‘रामजी की निकली सवारी’ ‘भारत का बच्चा बच्चा जय जय श्रीराम बोलेगा’ यांसारख्या भक्तिगीतांवर युवक-युवतींनी डमरू व डफळीच्या तालावर उत्स्फूर्त नृत्य केले. ओम श्री शंभो यात्रा समिती व हिंदू बांधवांच्या वतीने निर्भय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश रोडे यांच्या नेतृत्वाखाली महाआरती केली. त्यानंतर सालबर्डी येथील खडकाखालील भुयारातील स्वयंभू शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करून १५१ कलशांद्वारे जलाभिषेक केला. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात भाविकांनी जलाभिषेकाचा सोहळा अनुभवला. यात्रेत विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, मान्यवरांसह तालुक्यातील नागरिक सहभागी झाले होते. शहरातील मुख्य मार्गांवर नागरिकांची गर्दी झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिकांनी कावड यात्रेचे दर्शन घेतले. दरम्यान, शिवाजी चौक व जयस्तंभ चौक परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. मात्र उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश पाटील, ठाणेदार राहुल आठवले, नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवला. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली.
विविध देखाव्यांचे दर्शन ः यामध्ये चौकात उभारण्यात आलेल्या स्वागत कमानी, फुलांची सजावट आणि भक्तांच्या घोषणांमुळे वातावरण अधिकच भारावून गेले होते. यानंतर कावड यात्रा जयस्तंभ चौकातील गणपती मंदिरासमोर पोहोचली. येथे बैलबंडीवर सजवण्यात आलेल्या विविध धार्मिक देखावे, मोर्शीचे आराध्य दैवत महादेव महाराज, मारुती महाराज, संत रामजीबाबा, गंगाराम महाराज, शेगावचे संत गजानन महाराज, शिवलिंगाच्या प्रतिमा असलेल्या देखाव्यांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या धार्मिक देखाव्यांवर जेसीबीच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. फुलांच्या वर्षावात पुढे सरकणारी ही शोभायात्रा नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.