![]()
तान्ह्या पोळ्याची चाहूल लागताच शहरातील बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. पोळ्याच्या सणासाठी लागणाऱ्या पारंपरिक बैलजोड्यांसोबतच यंदा आधुनिक, आकर्षक आणि कलात्मक स्वरूपातील लाकडी बैल तसेच बैलगाड्या दाखल झाल्या आहेत. विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या राजकमल परिसरातील रस्त्यांवर याची किरकोळ विक्री हि केली जात आहे. पूर्वी केवळ माती किंवा साध्या लाकडापासून बनवलेल्या बैलजोड्यांना मागणी असायची. मात्र, यंदाच्या वर्षी बाजारात सुबक नक्षीकाम आणि विविध प्रकारची सजावट असलेल्या टिकाऊ लाकडी बैलजोड्या आणि लाकडी बैलगाड्यांनी ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. २०० रुपयापासून विक्रिसाठी असलेल्या पारंपरिक लाकडी कारागिरीला आधुनिक डिझाइनची जोड मिळाल्याने बाजारात या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तान्ह्या पोळ्याच्या दिवशी लहान मुलांमध्ये विशेष उत्साह असतो. चिमुकले या लाकडी बैलांना रंगवून, सजवून त्यांची विधिवत पूजा करतात व उत्साहात मिरवणूक काढतात. मुलांचा हा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि सणाचा पारंपरिक वारसा जपण्यासाठी विक्रेत्यांनी विविध आकारांतील व बजेटमधील लाकडी बैलजोड्यांचे स्टॉल्स थाटले असून, त्यांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Source link
तान्ह्या पोळ्याची बाजारपेठ सजली:पारंपरिक, आधुनिक नक्षीदार लाकडी बैलजोड्यांना पसंती