![]()
डॉ. नागनाथ अण्णांनी सातारा जेलच्या तटाहून टाकलेल्या उडीची प्रेरणा नव्या पिढीने घ्यावी, असे प्रतिपादन पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी स्मारक समितीचे प्रमुख वैभव नायकवडी यांनी केले. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला ८२ पूर्ण झाल्याबद्दल सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या स्मृती स्तंभाला अभिवादन करताना ते बोलत होते. यावेळी कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लुटपुटे, सातारा शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख सचिन म्हेत्रे, बाळासाहेब नायकवडी, अजित वाजे, युवा नेते वीरधवल नायकवडी, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे अनेक वारसदार, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ८२ व्या या स्मृती सोहळ्यासाठी सातारा कारागृह परिसरामध्ये चैतन्य पसरले होते. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्मृतीस्तंभावर फुलांची सजावट केली होती. प्रारंभी सातारा कारागृहासमोर उभारलेल्या स्मृतीस्तंभाला वैभव नायकवडी व मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. साखर कामगार संघटनेचे सांगली जिल्हा सचिव शिवाजी पाटील यांनी प्रास्ताविक केले. वैभव नायकवडी पुढे बोलताना म्हणाले, भारत मातेला स्वातंत्र्य करण्यासाठी अण्णांनी गोव्याहून शस्त्रे आणली, धुळे खजिना, शेनोली पे ट्रेन लुटली. क्रांती चळवळ चालवण्यासाठी सशस्त्र सेना उभी करण्यासाठी हुतात्मा नानकसिंग, मनसासिंग यांना दिल्लीहून आणले. देश स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले, ब्रिटिश सरकारला देशातून हद्दपार करण्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग आहे, नागनाथ अण्णांनी महात्मा गांधींचा आदर्श घेत स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराने वाळवा तालुक्यामधील सशस्त्र सेना उभा केली. त्यामुळे इंग्रज सरकारला देश सोडून जाणे भाग पडले. १९४२ ते ४४ दरम्यान क्रांती चळवळ चांगली पेटली होती. नागनाथ अण्णांना अटक करण्यात आली. भारत मातेचे देशभक्तीचे उदगाते नागनाथ अण्णा कधी स्वस्थ बसणारे नव्हते, त्यांनी सातारा जेलच्या तटावर तटावरून १० सप्टेंबर रोजी देश स्वतंत्र करण्यासाठी रोजी अण्णांनी उडी टाकली. सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचे स्वागत यशवंतराव चव्हाण यांनी केले. त्याला ८२ वर्षे पूर्ण होत आहेत. देशामध्ये तीन ठिकाणी इंग्रज सरकारला विरोध करणारे लोक कार्यरत होते, त्यामध्ये (तत्कालीन सातारा जिल्ह्यातील )वाळवा तालुक्यातील प्रतिसरकार शेवटपर्यंत कार्यरत राहीले. असे त्यांनी सांगितले. बाळासाहेब नायकवडी यावेळी म्हणाले, १९४२ ते ४४ हा स्वातंत्र्य चळवळीचा टप्पा खूप महत्त्वाचा होता. नागनाथ अण्णांचा विश्वासघात करीत वाढवे त्यांना अटक झाली. आणि वाळवा तालुक्यातील स्वातंत्र्य चळवळ गतिमान झाली. नागनाथ अण्णांची सातारा जेलच्या तटावरून टाकलेली उडी ही देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सुवर्णक्षरांनी लिहिण्यासारखी आहे. नव्या पिढीने याचा अभ्यास केला पाहिजे, यातून शिकलं पाहिजे. प्रेरणा घेतली पाहिजे. या स्वातंत्र्य चळवळीसाठी अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकांनी बलिदान दिले. ते आजच्या पिढीने विसरून चालणार नाही. सातारा कारागृह अधीक्षक ब्रह्मदेव लुटपुटे म्हणाले इंग्रज सरकार विरुद्ध नाना पाटील नागनाथ अण्णांनी जे क्रांती चळवळीचे बंड केले. ते महान कर्तुत्व होते. ते नव्या पिढीच्या कायम स्मरणात राहील. सातारा शहर पोलीस स्टेशनचे प्रमुख सचिन म्हेत्रे म्हणाले मी सांगली जिल्ह्याचा सुपुत्र आहे. मला मोठा अभिमान आहे. नागनाथअण्णा आणि क्रांतिकारI यांनी निर्माण केलेला स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तुम्हाला आम्हाला सर्वांना कायम प्रेरणा देत राहणार आहे. सर्व श्रमिक संघटनेचे जिल्हा सेक्रेटरी प्रमोद परमने, जिल्हाध्यक्ष शंकर पाटील, कॉ. विजय निकम, सी.पी. आय.चे अध्यक्ष कॉ. शामराव चिंचणे, प्रतिसरकार स्मारक समितीचे सातारा अध्यक्ष असलम तडसरकर, सामाजिक कार्यकर्ते गौतम भोसले, खटाव तालुका पाणी परिषदेचे तालुकाध्यक्ष डी.बी. जाधव, नगरसेवक शंकर माळवदे, क्रांतिसिंह नाना पाटील गौरव समितीचे कार्याध्यक्ष संपत जाधव, वाळवा येथून हुतात्मा संकुलाचे युवा नेते वीरधवल नायकवडी, बाळासाहेब नायकवडी, अजित वाजे, मुख्याध्यापक व्ही.बी. पाटील, मुख्याध्यापिका वंदना ठोंबरे, माजी मुख्याध्यापक एम.डी. कांबळे, भगवान अडीसरे, महादेव शेळके, प्रा. राजा माळगी, राजाराम शिंदे, अशोक मारुती खोत, सागर चिखले, अरुण पाटील, दिलीप माळी, शंभू इंगोले, सागर जाधव, आकाश मंडले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आभार सामाजिक कार्यकर्ते विजय मांडके यांनी मानले.
Source link
नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारा जेलच्या तटावरून टाकलेल्या उडीला 82 पूर्ण:जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे अभिवादन