Headlines

शिवराज मोरेंवरील हल्ल्याप्रकरणी वडेट्टीवारांचे फडणवीसांना पत्र:निष्पक्ष चौकशीसह कठोर कारवाईची मागणी




नागपूर येथे 9 सप्टेंबर रोजी आंदोलनादरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचे पडसाद उमटू लागले आहेत. या घटनेची तातडीने निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांची भेट घेऊन या प्रकरणावर चर्चा केली. तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून चौकशी आणि कारवाईच्या मागण्या केल्या आहेत. आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं? नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाची प्रत देण्यासाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत होते. या आंदोलनादरम्यान शिवराज मोरे यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. मोरे यांच्यावर हेल्मेट घातलेल्या आणि पोलिसांच्या वेशात उपस्थित असलेल्या व्यक्तीने हल्ला केल्याचा दावा वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. या घटनेमुळे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पोलिसांची भूमिका आणि हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण घटनेची वस्तुनिष्ठ चौकशी करून नेमके काय घडले, हे स्पष्ट करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. पोलीस आयुक्तांची भेट; निष्पक्ष चौकशीची मागणी घटनेनंतर विजय वडेट्टीवार यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे यांची भेट घेतली. यावेळी शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची पार्श्वभूमी, उपलब्ध पुरावे आणि आंदोलनस्थळी घडलेल्या प्रकाराबाबत चर्चा करण्यात आली. या प्रकरणात कोणताही राजकीय पूर्वग्रह न ठेवता स्वतंत्र आणि निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. हल्ल्यात सहभागी व्यक्तीची ओळख पटवून उपलब्ध पुराव्यांच्या आधारे कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे. पत्रात त्यांनी शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याची तातडीने चौकशी करून संबंधित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. हेल्मेट घातलेल्या कथित पोलिसाची ओळख निश्चित करून त्याला अटक करावी, तसेच उपलब्ध पुराव्यांच्या आधारे संबंधितांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ आणि इतर लागू कायद्यांनुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे. CCTV आणि मोबाईल व्हिडिओ तपासण्याची मागणी या घटनेच्या तपासासाठी आंदोलनस्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, छायाचित्रे, प्रसारमाध्यमांकडील दृश्यफिती आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तातडीने सुरक्षित करण्यात यावेत, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.तसेच प्रत्यक्षदर्शी, संबंधित कार्यकर्ते आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवावेत, असेही वडेट्टीवार यांनी पत्रात म्हटले आहे. शिवराज मोरे यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक असल्यास वैद्यकीय अहवालही तपासाचा भाग म्हणून नोंदवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेत प्रत्यक्ष हल्लेखोराव्यतिरिक्त इतर व्यक्तींचा सहभाग, चिथावणी, पूर्वनियोजन किंवा सहाय्य केल्याचे तपासात आढळल्यास संबंधितांवरही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. तपासाची प्रगती आणि करण्यात आलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती तक्रारदार किंवा संबंधित पक्षाला नियमानुसार देण्यात यावी, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. ‘आंदोलन करणे हा लोकशाही अधिकार’ शांततापूर्ण आंदोलन आणि निषेध नोंदविणे हा लोकशाही व्यवस्थेतील महत्त्वाचा अधिकार आहे. या अधिकाराचा वापर करणाऱ्या नागरिकांवर हल्ले होत असतील, तर हा लोकशाहीसाठी गंभीर इशारा आहे, अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. त्यामुळे या घटनेकडे केवळ राजकीय वाद म्हणून न पाहता कायदा-सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसच्या सात प्रमुख मागण्या काँग्रेसने या प्रकरणात एकूण सात प्रमुख मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये शिवराज मोरे यांच्यावरील कथित हल्ल्याची तातडीने निष्पक्ष व सखोल चौकशी करणे, संबंधित व्यक्तींविरुद्ध कायद्यानुसार FIR नोंदवून पुराव्यांच्या आधारे अटक करणे आणि सीसीटीव्ही, व्हिडिओ, छायाचित्रे व इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे सुरक्षित करणे यांचा समावेश आहे. याशिवाय प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवणे, इतर व्यक्तींचा सहभाग किंवा पूर्वनियोजन आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणे, तपासाची माहिती संबंधित पक्षाला देणे आणि राज्यातील शांततापूर्ण आंदोलने व राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करणे, या मागण्याही करण्यात आल्या आहेत. ‘दोषींवर कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे’ शिवराज मोरे यांच्यावरील कथित हल्ल्याची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे आणि तपासात दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणात उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब यामधून घटनेची नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहीलेले पत्र
हेही वाचा.. टोकाची भाषा सोडा, नाहीतर आंदोलनाची दिशा भरकटेल:मराठा आरक्षणावर नरेंद्र पाटलांचा जरांगेंना थेट इशारा, फडणवीसांच्या कामाचीही पाठराखण मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. मराठा समाजाच्या मागण्या रास्त पद्धतीने आणि कायद्याच्या चौकटीत मांडल्या पाहिजेत; मात्र सरकारमधील नेत्यांवर एकेरी भाषेत टीका करणे, शिवीगाळ करणे किंवा टोकाची भूमिका घेणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *