Headlines

कारची काच फोडून पैसे लांबवणारी मध्यप्रदेशातील टोळीचा पर्दाफाश:2.75 लाख रुपये जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई




​हिंगोली शहरातील जवाहर रोडवरील जैन मंदिरासमोर कारची काच फोडून रोख ३,००,००० रुपये लांबवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका कुख्यात टोळीचा माग काढून त्यांच्या घरातून एकूण २,७५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ​सेनगाव तालुक्यातील खुडज येथील अरुण टाले हे ता १९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास हिंगोली येथील मुथूट फायनान्स मधील गोल्ड लोन बंद करण्यासाठी आले होते. त्यांनी हिंगोली येथील जवाहर रोडवरील जैन मंदिरासमोर त्यांची कार उभी केली होती. ते कार्यालयात जाऊन परत आले असता, अज्ञात व्यक्तीने चालक बाजूकडील दरवाजाची काच फोडून कारमधील नगदी ३,००,००० रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी अरुण टाले यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. ​सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा यांनी हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांना सूचना दिल्या. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक वसंत आरसेवार यांचे विशेष तपास पथक नेमण्यात आले. त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक आरसेवार जमादार गजानन पोकळे, पांडुरंग राठोड, निरंजन नलवार, लिंबाजी वाव्हळे, सतीश जाधव, शैलेंद्र साळवे, साईनाथ कंठे, दत्ता नागरे, प्रदिप झुंगरे, ईरफान पठाण व मारोती काकडे यांच्या पथकाने गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या गुन्ह्यात मध्य प्रदेशातील आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये राजेश सिसोदिया, (रा. गुलखेडी, ता. पचोर, जि. राजगड), कालू बनवारी सासी, (रा. कडीयासासी, ता. पचोर, जि. राजगड), विक्की नजाम सासी उर्फ सिसोदिया ( रा. कडीया सासी, ता. पचोर, जि. राजगड), मोनू नरपत सासी उर्फ सिसोदिया, रा. कडीया सासी, ता. पचोर, जि. राजगड) यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मध्यप्रदेशात त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली. ​पोलीस पथकाने त्यांच्या घरातून चोरी गेलेल्या रकमेपैकी एकूण २,७५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान त्यांच्या अटकेसाठी पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्या अटके नंतर हिंगोली जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *