![]()
पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने विजय भगवान दगडे यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. वाहतूक नियमांचा दंड टाळण्यासाठी त्यांनी टोयोटा फॉर्च्युनर गाडीवर यांत्रिक फ्लिपिंग बनावट नंबर प्लेट लावली होती. न्यायदंडाधिकारी दीप्ती डी. पाटील यांनी गुरुवारी हा आदेश दिला. आरोपीतर्फे ॲड. विजयसिंह ठोंबरे आणि ॲड. ऋषिकेश ताटे यांनी बाजू मांडली. वाकड पोलिस ठाण्यात दगडे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 336(3), 318(4), 319(2) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम 198 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 20 लाख रुपये किमतीच्या टोयोटा फॉर्च्युनर गाडीच्या मागच्या बाजूला बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती. या गाडीचा इतर गुन्ह्यांमध्ये वापर झाला आहे का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी ही गाडी जप्त केली आहे. जामीन अर्जावरील सुनावणीत, बचाव पक्षाने सांगितले की आरोपी पहिल्यांदाच अशा गुन्ह्यात अडकला आहे आणि त्याचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नाही. आरोपीने न्यायालयाच्या सर्व अटी पाळण्याची तयारी दाखवली. मात्र, सरकारी पक्षाने जामिनाला विरोध केला. त्यांनी म्हटले की आरोप गंभीर आहेत आणि आरोपीला जामीन मिळाल्यास तो साक्षीदारांवर दबाव आणू शकतो किंवा पुन्हा असाच गुन्हा करू शकतो. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर न्यायालयाने म्हटले की, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडीत ठेवण्याची गरज नाही. त्यानंतर न्यायालयाने दगडे यांना 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तेवढ्याच रकमेच्या जामिनावर सोडण्याचा आदेश दिला. तपासात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यांशी छेडछाड न करणे आणि भविष्यात कोणताही गुन्हा न करणे, अशा अटी न्यायालयाने घातल्या आहेत.
Source link
बनावट नंबर प्लेट प्रकरणी विजय दगडे यांना सशर्त जामीन:वाहतूक नियमांचा दंड टाळण्यासाठी वापरली होती यांत्रिक फ्लिपिंग प्लेट