Headlines

बार्शीच्या गौरी मुखवट्यांची लंडन, अमेरिकेसह जपानला भूरळ:राजाभाऊ उपरे यांच्या कलाकुसरीतून साकारलेल्या मुखवट्यांची किर्ती पोहचली सातासमुद्रापार‎


.

बार्शीच्या मातीत साकारलेल्या अप्रतिम कलेची मोहिनी आता थेट सातासमुद्रापार पोहोचली आहे. येथील ज्येष्ठ मूर्तिकार राजाभाऊ उर्फ अनंत माणिकराव उपरे यांच्या हातांतून साकारलेले रेखीव, मोहक आणि भावपूर्ण महालक्ष्मीचे मुखवटे आता महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जागतिक पटलावर पोहोचले आहेत. लंडन आणि अमेरिकेनंतर यंदा या मुखवट्यांची कीर्ती थेट जपानपर्यंत पोहोचली असून, यंदाचे महालक्ष्मीचे मुखवटे जपानमधील भाविकांसाठी रवाना झाले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बार्शीतील कलावंतांनी जपलेली ही गौरी-गणपती परंपरेची आंतरराष्ट्रीय ओळख आता अधिकच अधोरेखित झाली आहे.

विविध आकार, आकर्षक भावमुद्रा आणि मुद्रांमधील बारकाई टिपत केलेली कलाकुसर ही उपरे यांच्या मुखवट्यांची खासियत आहे. दोन फुटांपासून साडेचार फुटांपर्यंत विविध आकारांमध्ये महालक्ष्मीचे मुखवटे उपलब्ध आहेत. त्यासोबत कापडी हात, कापसाची हाफ बॉडी, फायबर बॉडी आणि पूजेसाठी आवश्यक सजावटीचे साहित्य यांचीही मोठी विविधता येथे पाहायला मिळते. पारंपरिक महालक्ष्मीच्या मुखवट्यांमुळे आशीर्वादाच्या मुद्रेतील हात पाहायला मिळतात. मात्र, उपरे यांनी यंदा त्याला वेगळा आयाम देत ‘सरळ हात लक्ष्मी’ हा नवा प्रयोग बाजारात आणला आहे. या आगळ्या संकल्पनेला ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परंडा तालुक्यातील कुंभेफळच्या विठ्ठल त्रिंबक तिपीले यांच्या कन्येकडे गौरी मुखवटे गेले आहेत.

राजाभाऊ उपरे यांना या कलेचा वारसा त्यांचे वडील माणिकराव उपरे यांच्याकडून मिळाला. वडिलांकडून मिळालेली कला त्यांनी केवळ जपली नाही, तर त्याला आधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि दर्जेदार साहित्याची जोड देत या कलेचा विस्तार देशभर केला. प्रत्येक मुखवटा तयार करण्यासाठी वर्षभर नियोजन आणि मेहनत घेतली जाते. मुखवट्याच्या प्रत्येक बारकाव्याकडे विशेष लक्ष दिले जाते.

^सुबक रेखीवपणा, डोळ्यांतील जिवंतपणा आणि उच्च दर्जाच्या फिनिशिंगमध्ये बार्शीतील मूर्तिकार अनंत उपरे यांचे गौरी (महालक्ष्मी) मुखवटे प्रसिद्ध आहेत. मुखवट्यांच्या डोळ्यांमधील जिवंतपणामुळे आम्ही जपानमध्ये गौरींसाठी बार्शीच्या गौरींना पसंती दिली. सुकन्या लटके, जपान

^कर्नाटक, आंध्र प्रदेशासह देशातील विविध राज्यांतून मुखवट्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यापूर्वी लंडन, अमेरिका तर यंदा जपानची भर पडली असून, बार्शीच्या मातीत तयार झालेली ही कलाकुसर थेट जागतिक बाजारपेठेत पोहोचली आहे. परंपरा, कल्पकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत आहे. बार्शीच्या कलेचा जागतिक गौरव ठरल्याचा अभिमान वाटतो. – राजाभाऊ उपरे, मूर्तीकार. बार्शी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *