![]()
छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी गावातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रात्री घरात बनवलेली खिचडी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील चौघांना अन्नातून भयंकर विषबाधा झाली. या घटनेत तीन-चार वर्षीय चिमुकल्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याच्या बहिणीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे चिंचोली लिंबाजी परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. खिचडी खाल्ल्यानंतर पहाटेपासून सुरू झाला त्रास मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली लिंबाजी येथील रहिवासी नारायण साहेबराव थोटे (३५), त्यांची पत्नी देवशाला (३०), मुलगी गायत्री (७) आणि मुलगा आयुष (३) यांनी मंगळवारी रात्री घरी बनवलेली खिचडी खाल्ली होती. त्यानंतर सर्वजण झोपी गेले. मात्र, बुधवारी पहाटेपासूनच कुटुंबातील चारही सदस्यांना अचानक उलट्या आणि जुलाबाचा प्रचंड त्रास सुरू झाला. वाटेतच चिमुकल्याने सोडले प्राण त्रास वाढू लागल्याने सुरुवातीला त्यांनी स्थानिक पातळीवरच प्राथमिक उपचार घेतले. मात्र, गुरुवारी पहाटे दोन वर्षीय आयुष आणि सात वर्षीय गायत्री या दोन्ही भावंडांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यांना तातडीने गावातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुलांची गंभीर अवस्था पाहून डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी सिल्लोड येथील रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांना सिल्लोडला घेऊन जात असताना गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास वाटेतच दोन वर्षीय आयुषची प्राणज्योत मालवली. पोटच्या गोळ्याने डोळ्यांदेखत प्राण सोडल्याने आई-वडिलांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. पित्यानेच दुपारी १२ वाजता आपल्या लहानग्याच्या पार्थिवाला अग्नी दिला. बहिणीची मृत्यूशी झुंज सुरू एकीकडे आयुषच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले, तर दुसरीकडे मृत्यूशी झुंज देणाऱ्या सात वर्षीय गायत्रीला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एका मोठ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुदैवाने, नारायण थोटे आणि त्यांच्या पत्नी देवशाला यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अन्नातून विषबाधा नेमकी कशामुळे झाली, याबाबत पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून पुढील तपास सुरू आहे. हेही वाचा.. पुण्यात FDAची मोठी कारवाई: बुधवार पेठेत 4 ट्रक पनीर-खवा जप्त, गणेशोत्सवाआधी भेसळीविरोधात धडक मोहीम गणेशोत्सवाच्याआधी पुण्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. बुधवार पेठ परिसरात एफडीएच्या पथकाने पनीर आणि खव्याने भरलेले चार ट्रक जप्त केले. हा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने कारवाईसाठी अनेक अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. गणेशोत्सवात मिठाई, मोदक, पेढे आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढते. या पदार्थांमध्ये खवा आणि पनीरचा वापर जास्त असतो. त्यामुळे या काळात दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन एफडीएने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगरात रात्री खिचडी खाल्ली अन् पहाटे उलट्या-जुलाब:2 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, विषबाधेचा संशय; बहिणीची प्रकृती गंभीर