Headlines

बिबवेवाडीतील भोंदू महिला मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल:कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या नावाखाली 45 हजार रुपयांची फसवणूक




पुण्यातील बिबवेवाडी परिसरात एका भोंदू महिलेसह तिच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कौटुंबिक अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. फसवणूक आणि जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी मोनाली विधाते, कृष्णा विधाते (दोघे रा. सुखसागरनगर, कात्रज), मोनालीचा भाऊ मयूर, अशोक बनकर आणि मंजू कौर यांच्याविरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदार सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी समाज माध्यमांवर ‘गुरुवर्य मोनाली आई विधाते’ या नावाने प्रसारित केलेल्या चित्रफिती पाहिल्या होत्या. या चित्रफितींमध्ये कौटुंबिक समस्या आणि इतर अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. मोनाली विधातेने अशा अनेक चित्रफिती प्रसारित केल्या होत्या. तक्रारदार डिसेंबर 2025 मध्ये तिच्या संपर्कात आले. कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या बहाण्याने मोनाली विधातेने तक्रारदाराला हळदी-कुंकू, बाहुली आणि दोर पाठवले. त्यानंतर तिने त्यांना बिबवेवाडीतील सुखसागरनगर येथील तिच्या घरी बोलावले. तिथे तिने तक्रारदाराला मृत्यूची भीती दाखवली आणि ‘पीडा’ दूर करण्यासाठी ‘उतारा’ करावा लागेल असे सांगितले.यासाठी तिने तक्रारदाराकडून वेळोवेळी रोख आणि ऑनलाइन माध्यमातून 45 हजार रुपये घेतले. पैसे दिल्यानंतरही तक्रारदाराला जीवे मारण्याची आणि मारहाण करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.मोनाली विधाते आणि तिच्या साथीदारांनी अशा प्रकारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *