![]()
“एका चौथी नापास माणसाने उपोषणाचे नाटक करत बेकायदेशीर मागण्या केल्या आणि सरकारने त्याच्या दबावाखाली येत ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणले आहे. सरकार चौथी पास माणसाच्या मागण्यांवर लगेच जीआर (GR) काढतं, हे राज्याचं मोठं दुर्दैव आहे,” अशा अत्यंत कडक शब्दांत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. वडीगोद्री येथे ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी हाके यांनी ओबीसी आरक्षणाची सद्यस्थिती, राज्य सरकारची भूमिका आणि मनोज जरांगे यांचे आंदोलन यावर सडेतोड उत्तरे दिली. सरकारने ओबीसी आरक्षणाची चेष्टा लावली लक्ष्मण हाके म्हणाले की, “गेल्या दोन-तीन वर्षांत सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आणि मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. आम्ही हे पुराव्यानिशी सिद्ध करायला तयार आहोत. शासनाने नुकतेच सुरू केलेले प्रमाणपत्र वाटपाचे शिबिर म्हणजे ‘खिरापत’ वाटण्याचा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कधीच घडले नव्हते.” “आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांची भेट नकोय, तर मराठा आणि ओबीसी उपसमितीच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत आमचे आरक्षण कसे संपले, हे आम्ही त्यांना समजावून सांगू. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड आणि उदय सामंत यांनीही यावेळी उपस्थित राहावे,” अशी मागणी त्यांनी केली. मनोज जरांगे आणि आंदोलनावर गंभीर आरोप जरांगे यांच्याकडून मंत्र्यांना आणि नेत्यांना दिल्या जाणाऱ्या शिव्यांवरून हाकेंनी तीव्र संताप व्यक्त केला. “जो माणूस लोकशाही मानत नाही, शिष्टमंडळाचा आदर करत नाही आणि मुख्यमंत्र्यांचाही मान ठेवत नाही, त्याच्याकडून काय अपेक्षा ठेवणार? जरांगे शिवीगाळ करत असताना, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या मोठ्या नेत्यांच्या घराण्याची अब्रू चव्हाट्यावर आणली जात असताना, हे सरकार मूग गिळून का गप्प बसले होते?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “जरांगे यांच्या आंदोलनात लाठीचार्ज झाला, पोलिसांवर हल्ले झाले आणि ओबीसींची घरे जाळण्यात आली. त्यावेळच्या एसआयटी (SIT) चौकशीचे काय झाले? या आंदोलनाची सखोल चौकशी झाली पाहिजे,” अशी मागणी हाके यांनी केली. दहीभाते प्रकरण आणि प्रमाणपत्रे “हैदराबाद गॅझेटमधील नोंदीनुसार मिळालेली अनेक प्रमाणपत्रे चॅलेंज झाल्यानंतर रद्द होणारच आहेत. जो खरा कुणबी आहे, त्याचेच प्रमाणपत्र टिकेल. ‘दहीभाते’ प्रकरणात मोडी लिपीतील वेगवेगळ्या भाषांतरांमुळे प्रमाणपत्र रद्द झाले, हे त्याचेच उदाहरण आहे,” असे ते म्हणाले. ओबीसी कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध हाके यांनी मादळमोही (गेवराई) येथे ओबीसी कार्यकर्त्याच्या गाडीवर झालेल्या दगडफेकीचा तीव्र निषेध केला. “गाडीवर ओबीसीचा लोगो होता म्हणून गाडी फोडली आणि उलट कार्यकर्त्यावरच 307 सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. हे जर कायद्याचे राज्य असेल, तर मुख्यमंत्री महोदय आम्हाला दुसऱ्या राज्यांत पाठवून द्या,” अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली. आमदारांना थेट इशारा “ज्या आमदारांनी आणि खासदारांनी मनोज जरांगेंच्या बेकायदेशीर मागण्यांना उघडपणे पाठिंबा दिला, त्यांना पुढच्या निवडणुकीत ओबीसी समाज घरी बसवणार आहे. नारायण कुचे आणि इतर नेत्यांना आम्ही पुढची निवडणूक जिंकू देणार नाही,” असा थेट इशाराही हाकेंनी दिला. “महाराष्ट्र आता फुले-शाहू-आंबेडकरांचा राहिला नसून तो कारखानदारांचा, भांडवलदारांचा आणि ‘जात चोरांचा महाराष्ट्र’ बनला आहे,” अशी अत्यंत बोचरी टीका करत लक्ष्मण हाके यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. ————- हेही वाचा… आंदोलनाने मराठा समाजाला नवीन लाभ मिळणे कठीण: SEBC टिकवणे हेच हिताचे- डॉ. बाळासाहेब सराटे आंदोलन गावात करा की मुंबईत करा, तूर्तास तरी आंदोलनाने मराठा समाजाला कोणताही जास्तीचा किंवा नवीन लाभ मिळणार नाही. सरकारने काय दिले आणि आंदोलनाने काय मिळाले याचा विचार करण्यात समाजाची दोन वर्षे गेली. आरक्षण महत्त्वाचे आहेच, पण गरजूंना आरक्षणापर्यंत पोहोचवणे त्याहून जास्त महत्त्वाचे आहे, असे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बाळासाहेब सराटे यांनी दिव्य मराठी डिजिटलशी बोलताना म्हटले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
चौथी पास माणूस मागण्या करतो अन् सरकार लगेच GR काढतं!:लक्ष्मण हाकेंची मनोज जरांगेंसह राज्य सरकारवर सडकून टीका