राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी चिंता व्यक्त केली आहे. “राज्यावर 100 टक्के दुष्काळाचे सावट असून शेतकऱ्यांची पिके जळण्याच्या अवस्थेत आहेत,” असे सांगत त्यांनी येत्या काह
.
पाण्यावाचून शेतकरी आणि शेती अडचणीत
पुण्यात माध्यमांशी संवाद साधताना कृषिमंत्री म्हणाले, “जूनमध्ये पाऊस पडला नाही, जुलैमध्ये काही प्रमाणात पडला, पण ऑगस्टमध्ये पावसाने खूप मोठा खंड दिला. पुणे, कोकण आणि ठाणे परिसराचा काही भाग वगळता मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग आणि उत्तर महाराष्ट्रात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असून, शेतकऱ्यांनी जे पेरले होते ते आता जळण्याच्या अवस्थेत आहे. कापूस आणि सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे.” बैलपोळ्याच्या सणावरही याच दुष्काळाचे सावट असल्याचे ते म्हणाले. “शेतकरी नाराज आहे, पण वर्षभर राबणाऱ्या बैलाची पूजा करणे त्याचे कर्तव्य असल्याने यंदाचा पोळा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे,” असेही भरणे यांनी नमूद केले.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
रोहित पवार आणि इतर आमदारांनी राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना 50 हजार आणि मजुरांना 25 हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी केली आहे. यावर बोलताना भरणे म्हणाले की, “ही मागणी चुकीची नाही. सर्व आमदार त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्यभरातून अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील ३ ते ४ दिवसांत हा अहवाल प्राप्त झाल्यावर सरकार योग्य तो निर्णय घेईल. मी स्वतः पुढील आठवड्यापासून कमी पाऊस झालेल्या भागांचा दौरा करणार आहे.”
काँग्रेसचे नेते कपिल पाटील यांनी कृत्रिम पावसाची तयारी लवकर करायला हवी होती, अशी टीका केली. त्यावर भरणे म्हणाले, “मागील वेळी कृत्रिम पावसाचे अनुभव फारसे चांगले आले नव्हते. मात्र, आता नवीन तंत्रज्ञान आले असेल, तर नक्कीच या प्रयोगाचा शासन सकारात्मक विचार करेल.”
कर्जमाफी आणि महिला शेतकरी कायदा
कर्जमाफीबाबत विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने कर्जमाफीचा फायदा होणार आहे. यासाठी 40 हजार 585 कोटी रुपयांची मोठी तरतूद करण्यात आली आहे. कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सरकारने हा निर्णय घेतला आहे, याचा एक ‘शेतकऱ्याचा मुलगा’ म्हणून मला अभिमान आहे.”
नव्याने आणलेल्या महिला शेतकरी कायद्याअंतर्गत, जर महिलेकडे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र असेल, तर तिला बँका किंवा इतर ठिकाणी पतीच्या कागदपत्रांची गरज भासणार नाही, आणि सर्व योजनांचा थेट लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पार्थ पवार मुंढवा जमीन घोटाळ्यावर
मुंढवा जमीन प्रकरणात पार्थ पवार यांच्यावर कोर्टाने केलेल्या निरीक्षणाबाबत विचारले असता, “हा न्यायप्रविष्ट विषय आहे. यात पार्थ पवार यांचा काहीही संबंध नसावा. पण ‘दूध का दूध आणि पानी का पानी’ नक्कीच होईल,” असे भरणे म्हणाले.
जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनावर सरकारची चर्चा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाबाबतही कृषिमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. जरांगे पाटील यांनी 12 सप्टेंबर रोजी बैठक घेऊन मुंबईकडे जाण्याबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. यावर भरणे यांनी सरकारच्या वरिष्ठ नेत्यांकडून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही चर्चा सुरू असून प्रसाद लाड, राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत यांच्यासह अन्य नेते या विषयावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रश्नावर निश्चितच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एमपीएससीच्या गोंधळावरही प्रतिक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांवरून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षेच्या फेरतपासणीचे आदेश दिल्याचा उल्लेख भरणे यांनी केला. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत विचारले असता, केवळ राजीनामा घेतल्याने प्रश्न सुटेल असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले. हा विषय मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या पातळीवर असल्याने त्याबाबत योग्य उत्तर मुख्यमंत्रीच देतील, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चेवर बोलताना, “याबाबत सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असेल,” असे सूचक विधानही त्यांनी यावेळी केले.
ही बातमीदेखील वाचा…
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे आक्रमक: अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर आम्हाला घ्यावा लागेल; ‘ज्युडिशियल इन्क्वायरी’ची मागणी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या मुद्द्यांवरून युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रश्नांवर न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी नुकतीच राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना या गैरप्रकारांचे सबळ पुरावे सादर केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्य सरकारवर, मुख्यमंत्र्यांवर आणि MPSC च्या अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला. येथे वाचा संपूर्ण बातमी