Headlines

मांजरीमध्ये 125 हून अधिक विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून बाप्पा साकारला:संजीव सोशल फाउंडेशनने मोफत कार्यशाळा घेऊन पर्यावरणाचा संदेश दिला




पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचावा, या उद्देशाने मांजरी येथे मोफत गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला विद्यार्थी आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मांजरी, शेवाळेवाडी, केशवनगर आणि साडेसतरा नळी परिसरातील १२५ हून अधिक विद्यार्थी व पालकांनी यात भाग घेतला. त्यांनी स्वतःच्या हाताने शाडू मातीपासून गणेशमूर्ती बनवण्याचा अनुभव घेतला. संजीव सोशल फाउंडेशनने संस्थापक छाया संजीव गदादे यांच्या पुढाकाराने ही कार्यशाळा आयोजित केली होती. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत होती. फाउंडेशनने विद्यार्थ्यांना मूर्ती बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आणि साधने दिली. यात पर्यावरणपूरक शाडू माती, गणेशमूर्तीचा बेस, मूर्ती घडवण्याची विविध साधने, रंग, ब्रश तसेच सजावटीच्या साहित्याचा समावेश होता. फाउंडेशनचे उपाध्यक्ष सूरज चव्हाण आणि संगीता दिवेकर यांच्या हस्ते भगवान श्री गणेश आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी स्वप्निल चतुर, अभिषेक सागरे, अक्षय दिवेकर, जान्हवी तायडे, अमृता भोसले, जयश्री गदादे, सार्थक खांडके, छाया गदादे यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक आणि नागरिक उपस्थित होते. प्रशिक्षक वेदिका हिंगमिरे यांनी विद्यार्थ्यांना शाडू माती कशी हाताळावी, मूर्तीला योग्य आकार कसा द्यावा, विविध अवयव आणि बारकावे कसे बनवावे, मूर्तीची रचना कशी समतोल ठेवावी, बेसवर मूर्ती कशी बसवावी, रंगकाम आणि सजावट कशी करावी, हे सर्व प्रत्यक्ष शिकवले. यामुळे विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती बनवण्याची कला जवळून समजली आणि स्वतःच्या हाताने बाप्पा साकारण्याचा आनंद मिळाला. छाया संजीव गदादे म्हणाल्या, गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि आनंदाचा सण आहे. पण त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. शाडू मातीपासून बनवलेल्या गणेशमूर्ती पाण्यात सहज विरघळतात, ज्यामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम कमी होतो. लहान वयातच मुलांना पर्यावरणपूरक पर्यायांची ओळख करून देणे आणि ‘बाप्पाची भक्तीही, पर्यावरणाची काळजीही’ हा विचार त्यांच्या मनात रुजवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *