![]()
मराठा आरक्षण, 58 लाख कुणबी-मराठा नोंदीसाठी आंतरवाली सराटी येथे 14 दिवसांपासून उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी मुंबईत धडकण्याचा निर्णय १२ सप्टेंबर रोजी बैठकीत घेण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या मुंबईत धडकण्यावर पूर्वप्रतिबंधक बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळाली. केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या भीतीपोटी लोकशाहीत नागरिकांचा आंदोलनाचा कायदेशीर अधिकार हिरावून घेता येणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती एम. सी. त्रिपाठी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. त्यावर जरांगे म्हणाले की, आम्ही मुंबईत आंदोलनाची परवानगी मागितली आहे. आता सरकारने परवानगी दिली किंवा नाही दिली तरी मराठा समाज बांधव मुंबईत धडकणारच. मुंबईतील रहिवासी नीलेश डहाणूकर आणि राजेश दळवी यांनी अॅड. मयूर खांडेपारकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. ऑगस्ट-सप्टेंबर २०२५ मधील आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबई पूर्णपणे ठप्प झाली होती, आता पुन्हा ती परिस्थिती उद्भवू नये म्हणून जरांगे व त्यांच्या समर्थकांच्या प्रस्तावित मुंबई मोर्चावर प्रतिबंध घालण्यात यावा, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आला. यावर खंडपीठाने म्हटले की, आपण एका लोकशाही देशात राहतो, जरांगेंना मुंबईत यायचे असेल, तर त्यांना नियमानुसार प्रशासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. अद्याप असा कोणताही अर्ज आलेला नाही. मग काहीतरी अघटित घडेल या केवळ शक्यतेवरून आम्ही मनाई आदेश कसा देऊ शकतो? राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता मिलिंद साठे यांनी स्पष्ट केले की, जरांगेंकडून आझाद मैदान किंवा मुंबईत कुठेही आंदोलनासाठी अद्याप कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही. तसेच कायदा व सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती हाताळण्यास पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. त्यावर न्यायालयाने नमूद केले की, जर कोणी कायद्याच्या तरतुदींविरोधात वागले तर कारवाईस राज्य शासन समर्थ आहे. गेल्या वर्षीसारखी परिस्थिती उद्भवल्यास, न्यायालय स्वतः ती हाताळण्यास सक्षम आहे. जरांगेंशी सरकारने संवाद साधून आवश्यक असल्यास त्यांना तातडीने वैद्यकीय मदत पुरवावी, असे निर्देशही न्यायालयाने दिले. मराठ्यांनी घरी बसू नये, सरकारचे नाक दाबू, अख्खा महाराष्ट्र ठप्प करू : जरांगे जरांगे म्हणाले की, राज्यभरातील मराठा समाजाने १२ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता आंतरवालीत यावे. आता सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही.आम्हाला अडवले तर अख्खा महाराष्ट्र ठप्प करू. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे गणेशोत्सवात कधीही विघ्न आणणार नाहीत : फडणवीस मनोज जरांगे १२ सप्टेंबरनंतर मुंबईमध्ये धडकण्याची तयारी करत आहेत. याविषयी सरकारची भूमिका काय आहे, कायदा-सुव्यस्थेचे काय, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, माझी अशी अपेक्षा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे कधीही हिंदूंच्या सणांमध्ये आणि गणेशोत्सवात विघ्न आणणार नाहीत. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय तातडीने मागे घ्यावेत : हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसी आरक्षणाला धक्का देणारे सर्व निर्णय मागे घ्यावेत. कुणबी प्रमाणपत्रे देण्यासाठी शिबिरे कशी काय घेतली जातात? ही प्रमाणपत्रांची खिरापत आहे का? हायकोर्टाची ५ प्रमुख निरीक्षणे 1. आंदोलनाचा हक्क अबाधित: कोणालाही केवळ भीती, जुन्या अनुभवांमुळे आंदोलनापासून रोखता येणार नाही. शांततेने आंदोलन कायदेशीर अधिकार. 2. परवानगीविना आंदोलन नाही: मुंबईत आंदोलनासाठी प्रशासनाची रीतसर परवानगी बंधनकारक. जरांगेंनी अद्याप परवानगी मागितलेली नाही. 3. कायदा मोडल्यास कारवाई: आंदोलनादरम्यान कुणी कायदा हातात घेतल्यास त्यावर कारवाई करण्यास राज्य शासन पूर्णपणे सक्षम आहे. 4. शासनाला चर्चेचे निर्देश : राज्य सरकारने पुढाकार घेऊन जरांगे यांच्याशी संवाद साधावा. 5. वैद्यकीय मदतीची हमी : जरांगेंना सरकारने वैद्यकीय मदत उपलब्ध करून द्यावी. ————- हेही वाचा.. जरांगेंच्या उपोषणाचा 14वा दिवस:ही अटीतटीची लढाई, कुणीही घरी बसू नका; सरकार स्वतःला कोर्टापेक्षा मोठे समजतंय- मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाचा आज सलग 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून अन्नाचा एकही कण न घेतल्यामुळे त्यांची प्रकृती आता अत्यंत खालावली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचे आवाहन करत उद्या दुपारी 12 वाजता अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठक होणार असल्याचे सांगितले. या बैठकीला महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले. सविस्तर वाचा
Source link
जरांगेंच्या उपोषणाचा 15वा दिवस:आंतरवालीत आज राज्यव्यापी बैठक, मुंबईत धडकण्याची तयारी; मराठ्यांनी घरी बसू नये, अख्खा महाराष्ट्र ठप्प करू- जरांगे