![]()
महासागरातील प्रदूषण, प्लास्टिकचा वापर व मानवी हस्तक्षेपामुळे धोक्यात आलेली सागरी जीवसृष्टी यांचे विदारक वास्तव प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘व्यथा सागरी जीवांची’ या विज्ञान एकांकिकेने लोहोणेर येथील जनता विद्यालयाला देवळा तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात प्रथम क्रमांक मिळवून दिला. विज्ञान नाट्यसंघाने सलग पाचव्यांदा जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळविला आहे. तालुकास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवात देवळा तालुक्यातील २६ शाळांनी सहभाग घेतला. ‘महासागराचे पुनरुज्जीवन- पिढ्यांचे जतन’ या विषयावर जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘व्यथा सागरी जीवांची’ ही एकांकिका सादर केली. भविष्यातील गंभीर संकटे विद्यार्थ्यांनी प्रभावी संवाद, अभिनय, पार्श्वसंगीत व नेपथ्याच्या माध्यमातून रंगमंचावर उभी केली. मासा, डॉल्फिन, कासव आणि ऑक्टोपस या सागरी जीवांच्या माध्यमातून त्यांची व्यथा मांडत विद्यार्थ्यांनी ‘महासागर वाचवा, सागरी जीव वाचवा’ असा संदेश दिला आहे. या नाटीकेला तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हास्तरीय विज्ञान नाट्य महोत्सवासाठी पात्र ठरत सलग पाचव्यांदा जिल्हास्तरावर जाण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या यशाबद्दल मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव, शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख, शालेय समिती अध्यक्ष जिभाऊ शिर्के आदींनी नाट्यसंघाचे अभिनंदन केले.एकांकिकेसाठी विज्ञान शिक्षक दौलत पवार, संजय आहेर, अनिल शेवाळे, माधुरी भामरे, स्वाती भामरे, ज्योती पाटील व अनिता पाटील यांचे सहकार्य लाभले. यांनी साकारल्या भूमिका एकांकिकेत सिद्धी गांगुर्डे (राक्षस), तेजल सूर्यवंशी (मासा), समीक्षा देशमुख (डॉल्फिन), करुणेश पवार (कासव), दिव्या शिरसाट (ऑक्टोपस), हेमांगी आहेर (डॉक्टर), अनुष्का सूर्यवंशी (विद्यार्थी) व तनुष्का सूर्यवंशी (निवेदक) यांनी भूमिका साकारल्या. दिग्दर्शन सुनील एखंडे यांनी केले. नेपथ्य – सचिन रौंदळ व अविनाश मोरे, रंगभूषा अनिल शिरसाठ, वेशभूषा- वैदही एखंडे, किमया सूर्यवंशी, आराध्या सूर्यवंशी, श्रावणी काकुळते, चेतन आहिरे व यश सूर्यवंशी.
Source link
सागरी जीवांच्या वेदना रंगमंचावर:‘व्यथा सागरी जीवांची’ विज्ञान एकांकीका अव्वल