Headlines

ग्रामस्थांमध्ये संताप:जायखेड्यातील गैरव्यवहार चौकशीला विलंब; सटाणा पंचायत समितीत ठिय्या




प्रतिनिधी | सटाणा जायखेडा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार व आर्थिक अनियमिततेच्या चौकशीला विलंब होत असल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बेमुदत उपोषणाच्या पाचव्या दिवशी उपोषणकर्ते बापूजी मोगरे यांची प्रकृती खालावल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी (दि. ११) बागलाण तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र, हा विषय तहसील कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर आंदोलकांनी पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले असून रात्री उशीरापर्यंत सुरू होते. चौकशी विनाविलंब पूर्ण न झाल्यास शनिवारी (दि. १२) जायखेडा गाव बंद आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. मोगरे यांनी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात सलग पाच दिवस अन्नत्याग केला असून, त्यांच्या वजनात सुमारे १० किलो घट झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. त्यांच्या प्रकृतीकडे प्रशासन व आरोग्य यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही करण्यात आला. वेळेवर वैद्यकीय तपासणी व उपचार होत नसल्याने जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला. उपोषणकर्त्याची लघवी न घेताही लघवीचा अहवाल देण्यात आल्याचा गंभीर आरोप करीत चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली. मोगरे यांनी ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराविरोधात तब्बल २२ दिवस आंदोलन केले. मात्र, अद्याप प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम होण्याची प्रशासन वाट पाहत आहे का, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. मात्र, समितीने केवळ काही मिनिटे गावात येऊन चौकशीचा देखावा केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. गावातील सर्व कामांची सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत समितीने गाव सोडू नये, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. चौकशीसाठी महिनाभर वेळ लागला तरी चालेल; मात्र संबंधित कागदपत्रांची तपासणी करून संपूर्ण अहवाल सादर करावा, अशी मागणी करण्यात आली. २७ दिवसांचा संघर्ष आणि बेमुदत उपोषणाचा सहावा दिवस या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कागदी कार्यवाहीपुरते न थांबता प्रत्यक्ष निर्णय व ठोस कृती करावी, अशी उपोषणकर्ते व ग्रामस्थांची मागणी आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय, पारदर्शक चौकशी आणि दोष आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे. चौकशी समिती बागलाण पंचायत समितीला येत आहे. समितीने वार्ड निहाय स्पॉटवर येऊन चौकशी करावी. चौकशीसाठी एक महिना घ्यावा, परंतु चौकशी करेपर्यंत येवल्याचे काम करू नये. जायखेडा ग्रामपंचायतीची चौकशी करावी अन्यथा जायखेडा गाव बंद व रास्ता रोको करू – ललित मोगरे, आंदोलनकर्ते समितीने प्रा‌‌थमिक माहिती घेतली ^तीन वर्षांच्या कालावधीची चौकशी करायची आहे. समितीने येऊन प्राथमिक माहिती घेतली आहे. आणखी २-३ वेळा समिती चौकशीला येईल. त्यासाठी १५ ते २० दिवस लागतील. – अतुल पाटील, गटविकास अधिकारी, बागलाण



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *