Headlines

कर्जमुक्ती योजनेत 11 हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर:दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना दिलासा; लाभासाठी आधार प्रमाणीकरण गरजेचे‎




दुष्काळाच्या सावटाखालील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीत ११ हजार ५० शेतकऱ्यांचा समावेश असून, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे. योजनेंतर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेली तसेच ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेली आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेली पीक कर्जे व पुनर्गठित, फेरपुनर्गठित कर्जे रुपये दोन लाखांपर्यंत कर्जमुक्तीच्या लाभासाठी पात्र राहील. कर्जमुक्तीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर जमा करण्यात येणार असल्यामुळे यादीतील पात्र शेतकऱ्यांनी विनाविलंब आधार प्रमाणीकरण पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, गितेशचंद्र साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. शेतकऱ्यांची जिल्हानिहाय यादी परिशिष्ट ‘अ’ व बँकनिहाय यादी परिशिष्ट ‘ब’ मध्ये समाविष्ट करण्यात आली असून, सदर यादी बँक शाखा, विकास संस्था व ग्रामपंचायतींमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. दुसऱ्या यादीतील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. यापूर्वी महाआयटीमार्फत ९०८७९ कर्ज खात्यांची माहिती अपलोड करण्यात आली होती. पात्र लाभार्थींची पहिली यादी २४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पहिल्या यादीतील आधार प्रमाणीकरण झालेल्या १९९१० पात्र लाभार्थींच्या कर्जखात्यात रुपये १६९.३६ कोटी कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे. आता शुक्रवारी ११ हजार ५० शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरणासाठी दुसरी यादी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहीर झालेल्या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जखाती ३१ मार्च २०२६ रोजीची कर्ज थकबाकी विचारात घेण्यात येणार असून १ एप्रिलपासूनचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी ३१ मार्च रोजीची कर्ज थकबाकी खातरजमा करून नजीकच्या आपल्या सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *