मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाने राज्यात वातावरण तापले असताना, राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी मोठी माहिती दिली आहे. “सरकार जरांगे पाटील यांच्या बहुतांश मागण्या मान्य करत असून, त्यांच्या 15 पैकी 12 मागण्या आ
.
जरांगे पाटलांच्या मागण्यांवर काय म्हणाले सामंत?
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारची भूमिका स्पष्ट करताना सामंत म्हणाले, “मनोज जरांगे साहेबांच्या 15 पैकी 12 मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत. उर्वरित तीन मागण्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता किंवा त्यांचे आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका कायम आहे.”
नंदुरबार नगरपालिकेसाठी 10 कोटींचा निधी
धुळे दौऱ्यादरम्यान उदय सामंत यांनी नंदुरबार नगरपालिकेसाठी निधी मंजूर झाल्याची माहितीही दिली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लंडनमधून नंदुरबारसाठी निधीची मागणी मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. नंदुरबार नगरपालिकेसाठी 10 कोटी रुपयांचा शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. या निधीचा उपयोग स्थानिक विकासकामांसाठी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजीच्या मुद्द्यावरही सामंत यांनी भाष्य केले.
गटबाजी करू नका; ही शेवटची संधी
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आपण स्पष्ट सूचना दिल्या असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांचे एकनाथ शिंदे यांच्यावर प्रेम आणि निष्ठा आहे. त्यामुळे आपापसात गटबाजी न करता एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “आपापसात गटबाजी करू नका. ही शेवटची संधी आहे. सगळ्यांनी एकत्र काम करा. यानंतरही जाणीवपूर्वक गटबाजी करण्याचा प्रयत्न केला, तर संबंधिताचे पद काढून घेण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला. गटबाजी करणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून पदांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात आपण स्वतः पालकमंत्र्यांशी चर्चा केली असून पक्षातील अंतर्गत प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे त्यांनी सांगितले.
धुळे जिल्ह्यात 2554 कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार
धुळे जिल्ह्यात आयोजित जिल्हा गुंतवणूक परिषदेत 2554 कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली. या परिषदेला पालकमंत्री जयकुमार रावल उपस्थित होते. जिल्ह्यात उद्योग वाढवण्यासाठी आणि नवीन गुंतवणूक आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी सांगितले. धुळे दौऱ्यात आपण शिवसेनेच्या मेळाव्यासोबतच उद्योजकांची बैठक आणि मराठी भाषा विभागाच्या बैठकीलाही उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धुळ्यात उद्योग भवनाचे उद्घाटन
धुळ्यात उद्योग विभागाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या उद्योग भवनाचे उद्घाटनही करण्यात येत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नवीन औद्योगिक वसाहती उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साक्रीमध्ये नवीन एमआयडीसी उभारण्याची तयारी
धुळे जिल्ह्यातील साक्री परिसरात नवीन एमआयडीसी उभारण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही सामंत यांनी सांगितले. वन विभागाची जमीन घेऊन या भागात औद्योगिक वसाहत उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. यामुळे धुळे जिल्ह्यात उद्योगांना चालना मिळण्याबरोबरच स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
धुळ्याची निर्यात वाढवण्याचा निर्णय
धुळे जिल्ह्यातून सध्या जवळपास 2000 कोटी रुपयांची निर्यात होत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. या निर्यातीत उद्योग विभागाचा सहभाग आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक उद्योगांना अधिक सुविधा, गुंतवणूक आणि बाजारपेठ उपलब्ध करून देऊन जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर 15 पैकी 12 मागण्या मान्य झाल्याचा उदय सामंत यांचा दावा आगामी काळात महत्त्वाचा ठरणार आहे. उर्वरित 3 मागण्यांवर न्यायालयीन बाबींचा अडथळा असल्याने त्यावर सरकार आणि जरांगे पाटील यांच्यातील पुढील चर्चा काय दिशा घेते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.
——————
हेही वाचा…
जरांगे पाटलांनी कोर्टाचे आदेश पाळावेत!: मंत्री गुलाबराव पाटलांचा सल्ला; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या इंग्रजीचेही केले तोंडभरून कौतुक

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. “जरांगे पाटील मुंबईला जातात कधीही आंदोलन करायला, तो त्यांचा विषय आहे. मात्र न्यायालयाचा आदेश सर्वांनी पाळावा, अशी अपेक्षा आहे,” असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले. जळगाव येथे पार पडलेल्या पोलीस पाटलांच्या मेळाव्यानंतर राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनासह अमली पदार्थ, पोलिसांचे काम, बनावट तूप, दुष्काळ आणि महायुतीतील अंतर्गत प्रश्नांवरही भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी