Headlines

पुण्यात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि गणेश मूर्ती खरेदीमुळे वाहतूक बदल:डेंगळे पूल, छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग, केशवनगरमध्ये मार्ग वळवले




पुण्यात प्राणप्रतिष्ठापना सोहळा आणि गणेश मूर्ती खरेदीमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. शिवाजीनगरमधील डेंगळे पूल परिसर, मध्य भागातील छत्रपती शिवाजी रस्ता, सारसबाग आणि मुंढव्यातील केशवनगर परिसरात हे बदल लागू होतील. शिवाजीनगर येथील डेंगळे पूल परिसरात गणेशमूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले आहेत. त्यामुळे या भागातील वाहतूक व्यवस्थेत रविवार, 13 सप्टेंबर आणि सोमवार, 14 सप्टेंबर रोजी बदल केले जातील. प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामुळे छत्रपती शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहील. वाहनांनी संताजी घोरपडे पथ, कुंभारवेस चौक आणि मंगळवार पेठेतील शाहीर अमर शेख चौक या मार्गाने जावे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी पुतळा चौक आणि खुडे चौकमार्गे कुंभारवाड्याकडे जाणाऱ्या वाहनांनी छत्रपती शिवाजी पुलावरून डावीकडे वळून संताजी घोरपडे मार्गाने कुंभारवेसकडे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सारसबाग परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा चौक ते समाधना भेळ केंद्र परिसरात सर्व प्रकारची वाहने लावण्यास मनाई केली आहे. वाहनचालकांनी मित्रमंडळ चौक ते पाटील प्लाझा आणि नीलायम चित्रपटगृहाजवळ वाहने पार्क करावीत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी वाहनचालकांना या बदलांची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. सोमवारी (14 सप्टेंबर) प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मध्य भागात आणखी वाहतूक बदल होतील. छत्रपती शिवाजी रस्ता पूर्णपणे बंद ठेवला जाईल. कसबा पेठेतील फडके हौद चौक ते जिजामाता चौक, फुटका बुरूज, अप्पा बळवंत चौक ते हुतात्मा चौक (बुधवार चौक), मोती चौक आणि मंगला चित्रपटगृहासमोरील रस्ताही वाहतुकीसाठी बंद राहील. मुंढव्यातील केशवनगर परिसरात मूर्ती खरेदीसाठी भाविकांची गर्दी होते. त्यामुळे सोमवारी (14 सप्टेंबर) या भागातही वाहतूक बदल करण्यात येतील आणि वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. शिवाजीनगर बसस्थानकातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बसच्या मार्गातही बदल करण्यात आला आहे. या बस स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना, टिळक रस्तामार्गे स्वारगेटकडे जातील. महापालिका भवन परिसरातून स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपी बस जंगली महाराज रस्त्याने जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *