![]()
हिंगोली जिल्हा न्यायालयात शनिवारी ता. 12 झालेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मोटर अपघाताची 145 प्रकरणे तडजोडी अंती निकाली निघाली आहेत. विशेष म्हणजे एक पक्षकार दिव्यांग असून तो वाहनात बसल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधिशांनी पक्षकाराच्या वाहनाजवळ जाऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. येथील जिल्हा व सत्र न्यायालयात प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस. एल. आणेकर, जिल्हा न्यायाधीश एस. एन. माने, जिल्हा न्यायाधीश डी. जी. ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकअदालत झाली. या राष्ट्रीय लोकअदालतीतील मोटार अपघात व इतर प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये सन 2024 मध्ये ज्योती महाजन यांचे मोटार अपघाताचे प्रकरण तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. यावेळी ॲड. सुरेश गडदे यांनी तडजोडीसाठी पाठपुरावा केला. यावेळी महाजन यांचे सासरे पक्षकार म्हणून उपस्थित असून त्यांना पक्षाघात असल्याने ते वाहनातच थांबल्याची माहिती ॲड. गडदे यांनी दिली. त्यानंतर प्रमुख जिल्हा न्यायाधिश आणेकर यांनी ते न्यायालयाच्या बाहेर येऊन महाजन यांची त्यांच्या वाहनाजवळ जाऊन त्यांची भेट घेतली व त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या या भुमीकेने न्यायालयीन प्रक्रियेसोबतच पक्षकारांच्या अडचणींचे संवेदनशीलतेने दखल घेणाऱ्या या कृतीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. या प्रकरणात झालेली 30 लाख रुपयांची तडजोड ही संबंधित कुटुंबासाठी मोठा आर्थिक दिलासा ठरली आहे. या प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ॲड. गडदे, ॲड व्यास, ॲड. मनीषा गडदे, ॲड. मुद्दाशीर, ॲड. अर्धापूरकर, ॲड. मस्के, ॲड. जगताप, ॲड. लेकुळे, ॲड. बाळू कापसे, ॲड. पवन बोरकर, ॲड. लोखंडे यांनी परिश्रम घेतले. लोक अदालत जलद न्याय देणारी लोकाभिमुख व्यवस्था- ॲड. सुरेश गडदे मोटार अपघात प्रकरण मध्ये लोक अदालत हे अत्यंत प्रभावी व्यासपीठ असून विमा कंपन्या पक्षकार आणि वकील यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यास कमी कालावधीत असंख्य प्रकरणी निकाली निघू शकतात. लोकअदालत ही केवळ तडजोड नसून जलद, सुलभ आणि परिणामकारक न्याय देणारी लोकाभिमुख व्यवस्था आहे.
Source link
राष्ट्रीय लोकअदालतीत 145 प्रकरणांचा निपटारा:प्रमुख जिल्हा न्यायाधिशांनी दिव्यांग पक्षकाराच्या वाहनाजवळ जाऊन घेतली भेट