.


पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी शेवगाव तालुक्यातील आदर्श गाव वाघोली येथे अनोखा उपक्रम राबविण्यात आला. “दिव्य मराठी’च्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘शिक्षण व युवक विकास समिती’च्या वतीने वाघोली जिल्हा परिषद केंद्र शाळेत पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा शनिवारी आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत वाघोली केंद्र शाळेंतर्गत येणाऱ्या सहा शाळांमधील १४० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
वाघोली, कुरण वस्ती, जमधडे वस्ती, दातीर वस्ती, पवार शेळके वस्ती, गोपाळ वस्ती आणि बहिरोबा वाडी येथील विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत सहभाग नोंदवला. पाथर्डी येथील आनंद महाविद्यालयाचे प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी युवा नेतृत्व उमेशभाऊ भालसिंग यांचेही सहकार्य लाभले. ‘पर्यावरण वाचवा, भविष्य घडवा’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी शाडू मातीच्या गणेशमूर्तींचा स्वीकार करावा, हा संदेश कार्यशाळेतून देण्यात आला.
कार्यशाळेस सरपंच सुष्मिताताई उमेशभाऊ भालसिंग, विस्ताराधिकारी रघुनाथ लबडे, उमेशभाऊ भालसिंग, केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा मंडलिक, कुरण वस्तीचे मुख्याध्यापक अशोक शिपलकर, जमधडे वस्तीचे अमोल जायभाय, दातीर वस्तीचे जयदीप राजळे, पवार शेळके वस्तीचे कल्याण शिंदे, गोपाळवस्तीचे राजू ब्राम्हणे, बहिरोबा वाडीचे दहिफळे, केंद्रप्रमुख शहादेव काळे, गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, राजूभाऊ जमधडे, मोहन मामा गवळी, आत्माराम शेवाळे, ग्रामसेविका फटाले मॅडम, अभिषेक भालसिंग, रामभाऊ गाडगे, कानिफ गाडगे, समाधान गाडेकर, संभाजी सरगर, देवा विष्णू गाडगे, भीमराज शिंदे, अभिजीत शिंदे, संदीप बडे, देविदास शिंदे, तुकाराम शेळके उपस्थित होते. प्रास्ताविक केंद्रप्रमुख काळे यांनी, सूत्रसंचालन सोमेश्वर शेळके, तर आभार मुख्याध्यापिका मंडलिक यांनी मानले. विद्यार्थ्यांच्या तळहाताच्या मापाचे सात मातीचे गोळे तयार करून त्यांना विशिष्ट आकार देत काही मिनिटांत सुबक गणेशमूर्ती कशी साकारायची, याचे प्रात्यक्षिक प्रा. सूर्यकांत काळोखे यांनी विद्यार्थ्यांना करून दाखविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीही स्वतःच्या हातांनी गणरायाची मूर्ती साकारण्याचा आनंद घेतला.
सात मातीचे गोळे; अन् बाप्पा तयार!