![]()
सर्वांच्या लाडक्या गणरायाची आज स्थापना होत असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे. यंदा जिल्ह्यात ९३९ गणेश मंडळांकडून गणेशमूर्तींची स्थापना केली जाणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २३२ पेक्षा अधिक गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त तैनात केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. रविवार असल्याने बाजारपेठांमध्ये नेहमीपेक्षा अधिक गर्दी दिसून आली. विविध आकारांच्या गणेशमूर्ती, आरास साहित्य, विद्युत रोषणाई आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली. यंदा पैठण २१२, गंगापूर ५३, कन्नड २१९, वैजापूर १००, सिल्लोड ९०, फुलंब्री ९०, खुलताबाद ८५ तर सोयगाव तालुक्यात ६० मंडळांकडून गणरायाची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यंदा डीजेला बंदी असून, मिरवणुकीत पारंपरिक वाद्याचा गजर राहणार आहे. गणेश मंडळांनी शांततेत उत्सव साजरा करावा, नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने केले आहे. सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी तृतीया तिथी संपून चतुर्थी सुरू होते. यंदा हरतालिका आणि गणेश स्थापना एकाच दिवशी आहे. गणेश स्थापनेसाठी सकाळी ७ वाजून ७ मिनिटे ते ८ वाजून ४० मिनिटे हा अमृत काळ आहे. दुपारी ११ वाजून ५ मिनिटे ते १ वाजून ४२ मिनिटे हा माध्यान्ह स्थापना मुहूर्त आहे. २३२ हून अधिक गावांत एकत्रितपणे ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येणार असल्याने सामाजिक एकोपा आणि सामूहिक उत्सवाला महत्त्व मिळणार आहे. या उपक्रमाकडेही विशेष लक्ष लागले आहे.विविध उपक्रम राबविण्याचा मंडळांचा मानस आहे. गतवर्षी ८७४ मंडळांनी गणरायाची स्थापना केली होती. यंदा ही संख्या ९३९ वर पोहोचली असून, त्यात ६५ मंडळांची वाढ झाली आहे. दरम्यान, मंडळांकडून गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे. Ãगणरायासोबत वरुणराजाचेही आगमन झाल्याने बाजारात उत्साह आहे. गणेशमूर्ती, सजावट, पूजेचे साहित्य खरेदीसाठी गर्दी आहे. पाऊस आल्याने आनंदाचे वातावरण आहे. या कालावधीत कोट्यवधींची उलाढाल होणार आहे. पवन लोहिया, माजी अध्यक्ष, व्यापारी महासंघ, पैठण ८८ मंडळांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी जिल्हा पोलिस दलाकडून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे नियोजन केले आहे.
Source link
939 मंडळे करणार गणरायाची स्थापना: 232 गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’, गतवर्षी 874 मंडळे, यंदा 65 वाढली, 88 मंडळांकडून शाडूच्या मूर्तीस पसंती