![]()
सिंहस्थ पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विविध कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रकार पुन्हा समोर आला आहे. सिद्धार्थनगर येथील कृषीनगर जॉगिंग ट्रॅकजवळ जलवाहिनीच्या कामासाठी रस्त्यावर आडवे टाकलेले काळे पाइप अंधारात न दिसल्याने दुचाकी त्यावर आदळली. या अपघातात सिद्धार्थ गोरे (रा. साईराम उपेंद्रनगर, सिडको) यांचा मृत्यू झाला, तर त्यांचे मित्र मनोज सूर्यवंशी गंभीर जखमी झाले. शनिवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. संतप्त जमावाने रविवारी मनपा प्रवेशद्वारावर मृतदेह ठेवत दुपारी १२:३० ते ३:३० वाजेपर्यंत आंदोलन केले. शहर अभियंता संजय अग्रवाल यांना घेराव घालत कारवाईची मागणी केली. कुटुंबातील एकाला मानधनावर घेण्यासह आर्थिक मदतीचा ठराव महासभेवर ठेवण्याचे सांगण्यात आले. दुपारी दोनला मृतदेह अंत्यविधीसाठी नेल्यानंतरही आंदोलन सुरू राहिले. महापौर हिमगौरी आडके यांनी गोरे कुटुंबीयांची भेट घेऊन उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. रास्ता रोकोचा प्रयत्न, मनपाची मनधरणी मृतदेह मनपा प्रवेशद्वारावर एक तास ठेवून ठिय्या देण्यात आला. त्यानंतर रास्ता रोकोचा प्रयत्न झाला. प्रशासनाकडून मनधरणीनंतर दुपारी साडेतीन वाजता नातेवाइकांनी मनपा परिसर सोडला. यावेळी पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता. कर्ता पुरुष गेल्याने कुटुंब वाऱ्यावर सिद्धार्थ यांच्या पश्चात आई, पत्नी, सहा महिन्यांची आणि दोन वर्षांची अशा दोन लहान मुली आहेत. निधनाचे वृत्त समजताच पत्नीने हंबरडा फोडला. कुटुंबातील कर्ता गेल्याने कुटुंब वाऱ्यावर आले आहे. मृत्यदेह घेऊन संतप्त नागरिकांनी मनपा प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला. दुसऱ्या छायाचित्रात आंदोलनात मृतक पत्नीने आपल्या अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुकलीला व तीन वर्षाच्या मुलीला घेऊन न्यायासाठी मनपा प्रशासनाला आर्त हाक दिली. शहरभर खोदकाम, सुरक्षेचे काय? शहरात रस्ते, जलवाहिनी आणि ड्रेनेजची कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खोदले असून खड्डेही आहेत. सूचना फलक, बॅरिकेडिंग, रिफ्लेक्टर आणि प्रकाश व्यवस्था नसल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी होत आहे. अपघातस्थळी रस्ता बंद करून पाइपलाइनचे काम सुरू होते. पाइपला रिफ्लेक्टर लावले होते, तर ५० मीटर अंतरावर रस्ता बंद असल्याची सूचना होती. परिसरातील सर्व पथदिवे सुरू होते. दुचाकी अतिवेगाने आल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसते. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, शवविच्छेदन अहवालानंतर चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.
Source link
रस्त्यात आडव्या पाइपवर दुचाकी धडकल्याने तरुण ठार:एक गंभीर, संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी; लेखी आश्वासनानंतर आंदाेलन मागे