Headlines

कळवणमध्ये 200 विद्यार्थ्यांनी साकारला शाडूमातीचा ‘बाप्पा’:स्वतः तयार केलेल्या मूर्तींची घरी प्रतिष्ठापना करण्याचा विद्यार्थ्यांचा संकल्प‎




‘दिव्य मराठी’च्या ‘मातीचे गणेश’ अभियानांतर्गत येथील जानकाई विद्यालयात शाडूमातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यालयातील २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यालयातील कलाशिक्षक मनीष देवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षाप्रमाणे विद्यार्थ्यांनी शाडूमातीला आकार देत आपल्या कल्पकतेतून सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. मूर्ती तयार करण्याच्या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना कलाकौशल्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचे महत्त्वही समजले. शाडूमातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी स्वतः अनुभवावी आणि त्यातून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा विचार त्यांच्या मनात रुजावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः घडविलेल्या मूर्ती घरी नेऊन त्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यामुळे पर्यावरणपूरक उत्सवाची संकल्पना कुटुंबापर्यंत पोहोचेल, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.श्री-गणेशमूर्ती विसर्जनाची सध्याची पद्धत पर्यावरणासाठी आव्हानात्मक ठरत आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व रासायनिक रंगांमुळे जलप्रदूषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शाडूमातीच्या मूर्तींचा वापर तसेच योग्य व पर्यावरणपूरक विसर्जन पद्धती याबाबत ठोस जनजागृती होणे आवश्यक आहे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या गणेशमूर्ती घरी नेल्याने ‘माझा गणपती, माझ्या हातचा गणपती आणि पर्यावरणपूरक गणपती’ ही संकल्पना विद्यार्थ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. कलाशिक्षक मनिष देवघरे हे १३ वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम राबवत आहेत. त्यामुळे संस्थेचे संस्थापक चंद्रकांत कोठावदे, संस्थेच्या सचिव उषाताई कोठावदे, मुख्याध्यापक एम. बी. जोशी, एस. एच. भामरे, व्ही. जी. जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *