![]()
सावेडी उपनगरातील प्रोफेसर चौकानजिक असलेला जॉगिंग ट्रॅक हा स्थानिक नागरिकांच्या आरोग्य आणि दैनंदिन व्यायामाचे प्रमुख केंद्र बनला आहे. या मैदानावर सकाळ व संध्याकाळच्या वेळेत आबालवृद्धांचा मोठा राबता पाहायला मिळतो. परिसरातील युवक, युवती, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक येथे नियमितपणे फिरण्यासाठी व धावण्यासाठी येतात. मात्र स्वच्छतागृह नसल्याने मैदानावर येणाऱ्यांना गंभीर समस्येला सामोरे जावे लागत आहे. या मैदानाच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत बालके आणि तरुण कबड्डी, खो-खो, क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन यांसारख्या विविध खेळांचा सराव करताना दिसतात. नागरिकांना मोकळा श्वास घेता यावा यासाठी ट्रॅकजवळ बाके बसवण्यात आली असून चारही बाजूंनी हिरवीगार झाडीही लावण्यात आली आहे. मात्र, इतकी उत्तम सोय असतानाही या मैदानात सार्वजनिक स्वच्छतागृह उपलब्ध नसल्यामुळे एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्वच्छतागृहाच्या अभावामुळे काहीनागरिक आणि असभ्य व्यक्ती मैदानाच्या कोपऱ्यांच्याआडोशालाच उघड्यावर लघुशंका करतात. यामुळे परिसरात अत्यंत दुर्गंधी पसरली असून व्यायाम आणि खेळासाठी येणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांना संकोचल्यासारखे होते. उघड्यावरील या प्रकारामुळे साथीचे आजार पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. या स्थितीबाबत अनेक क्रीडाप्रेमींनी व स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, या मैदानाच्या देखरेखीसाठी महापालिकेकडून कोणताही सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे येथे समाजकंटक व टारगट तरुणांचा वावर वाढला असून त्यांना विरोध करण्याची हिंमत कोणी करत नाही. मनपा प्रशासनाने या समस्येकडे तातडीने लक्ष देऊन येथे स्वच्छतागृह उभारावे व सुरक्षा रक्षक तैनात करावा, अशी मागणी होत आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणे हा स्वच्छता नियमांनुसार दंडनीय अपराध आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान व घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार सार्वजनिक जागी अस्वच्छता करणाऱ्यांवर ५०० रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. वारंवार उल्लंघन केल्यास महापालिका प्रशासनाला कायदेशीर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आहे. उघड्यावर लघुशंका हा दंडनीय अपराध
Source link
जॉगिंग ट्रॅकवर स्वच्छतागृहाचा अभाव नागरिकांचे आरोग्य आलेय धोक्यात:सावेडीतील मैदानावरील प्रकार, नागरिकांची दंडात्मक कारवाईची मागणी