![]()
नगरपरिषदेच्या शाळांमधील शिक्षणाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये नाराजी असतानाच येथील नगरपरिषदेने शिक्षण व्यवस्थेला नवसंजीवनी देणारा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन २००४, अर्थात गेल्या २२ वर्षांपासून हा विषय रखडला होता. विविध तांत्रिक कारणे त्यासाठी पुढे केली जात होती. अखेर शिक्षक भरती प्रक्रिया मार्गी लावत न.प. प्रशासनाने एकाच दिवशी सहा शिक्षकांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. नगराध्यक्ष अविनाश गायगोले आणि नगरसेवकांनी पदभार स्वीकारताच शाळांचे नुतनीकरण, सोयी-सुविधा आणि सर्वात महत्त्वाचा असलेला शिक्षकांचा तुटवडा हा विषय प्राधान्याने हाती घेतला होता. त्यामुळे मनुष्यबळाची पूर्तता करण्यासाठी ते सतत झटत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यामुळे नोकरी मिळालेल्या शिक्षकांसह शिक्षणाप्रती जागरूक नागरिकांनीही आनंद व्यक्त केला आहे. मुख्याधिकारी विजय लोहकरे आणि अभ्यासगटाच्या शिफारसींमुळे हा प्रश्न निकाली निघाला. पवित्र पोर्टलद्वारे प्राप्त झालेल्या उमेदवारांपैकी ६ शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली. नगरपरिषदेच्या सभागृहात अत्यंत भावनिक, उत्साही वातावरणात हा नियुक्ती सोहळा पार पडला. नवनियुक्त शिक्षक आपल्या कुटुंबीयांसमवेत उपस्थित होते. यावेळी बोलताना नगराध्यक्ष गायगोले यांनी सांगितले की, आपण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणासारख्या अत्यंत महत्त्वाच्या, जिव्हाळ्याच्या विषयाशी आजपासून जोडले गेलात. आजपासून पुढील तीस वर्षे आपण नगरपालिकेचे कर्मचारी आहात. गोरगरीब कुटुंबातील मुला-मुलींना दर्जेदार, व्यवस्थापूर्ण शिक्षण मिळावे. आपल्या हातून गुणवंत विद्यार्थी घडावेत. या उद्देशानेच ही नियुक्ती करण्यात येत आहे. आपण हे आव्हान म्हणून स्वीकाराल. नगरपरिषदेच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणाल. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी उपनगराध्यक्ष प्रियंका मालठाणे, शिक्षण सभापती मो. मुनाफ मो. रेहान, बांधकाम सभापती शेख नईम, नगरसेवक आसीफ ताज मोहमद, मो. कलीम मो. कलाम, शोयब खान, प्रदीप देशमुख, राजु कुरेशी, अकबर शहा, मुज्जमील अली, रहीम शहा, अजय पसारी, सुधीर देवगीरे, गजानन विजेकर, श्रीकांत जुनघरे आदी मान्यवर उपस्थित होते. अभ्यासगटाची नियुक्ती सदर भरतीप्रक्रियेसाठी आमदार ज. मो. आभ्यंकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक व अनुभवी शिक्षणतज्ज्ञ प्रा. रवींद्र कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष अभ्यासगटाची नियुक्ती करण्यात आली होती. या अभ्यासगटाने सर्व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास करून शासनाकडून सर्व आवश्यक मान्यता मिळवून घेतल्या.
Source link
अखेर न्याय मिळाला; 22 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सहा शिक्षकांना नियुक्ती:अभ्यासगटाच्या गठनातून निघाला यशस्वी मार्ग