![]()
गावाच्या मुख्य भागातील सुमारे ७०० मीटर सिमेंट रस्त्याची दहा वर्षांपासून दुरवस्था झाली. आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या या मुख्य मार्गालगत नालीचे पाणी थोडा पाऊस झाला तरी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर येते आणि रस्त्यावर सांडपाणी येते. या सिमेंट रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून या मार्गावरून वाट काढावी लागते. नालीतील सांडपाणी, दुर्गंधीमुळे नागरिकांना नाकाला रुमाल बांधून रस्ता आेलांडण्याची वेळ आली. दहा वर्षांपासून ही परिस्थिती कायम असताना प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे. या रस्त्यावर आठवडी बाजाराच्या दिवशी नागरिकांची वर्दळ असते. याच मार्गावर गावातील मारुती मंदिर, ईश्वर देशमुख सभागृह, जुनी वस्ती, इतर महत्त्वाची ठिकाणे आहेत. सभागृहाकडे जाण्यासाठीही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याच मार्गावरून जावे लागते. सांडपाण्यातून वाट काढताना घाणीचे शिंतोडे त्यांच्या गणवेशावर उडतात. गेल्या दोन पंचवार्षिक कालावधीत ग्रामपंचायतीतून कामे झाली असतील, मात्र गावाच्या मध्यवर्ती भागातील रस्त्याचा, नालीचा प्रश्न दहा वर्षे प्रलंबित आहे. गावात काही काळ प्रशासकीय कारभारही झाला,मात्र समस्या मात्र आजही तशीच आहे. निवडणूक आली की नागरिकांच्या दारात जाण्यापेक्षा गावाच्या मुख्य रस्त्यावर साचलेल्या सांडपाण्यातून एकदा चालून पाहावे, म्हणजे नागरिकांच्या वेदना, समस्या जाणवतील, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांत उमटत आहे. गावातील मुख्य रस्त्यावर नागरिकांना सांडपाण्यातून वाट काढावी लागत असेल, तर स्वच्छ, सुंदर, निरोगी गावाची संकल्पना कुठे हरवली,असा प्रश्न उपस्थित होत आहे. अकोला बाजारच्या या प्रश्नाची पालकमंत्री,आमदार, खासदार यांनी दखल घेऊन संबंधित विभागाला निर्देश द्यावेत, अशी मागणी होत आहे. यवतमाळ रोड ते मुख्य वस्ती व आठवडी बाजार या सुमारे ७०० मीटर सिमेंट रस्त्याची पाहणी करून रस्त्याची उंची वाढवणे, मजबूत रस्ता तयार करणे, दोन्ही बाजूंच्या गटारांची योग्य बांधणी करून ती आवश्यक त्या ठिकाणी बंदिस्त करणे, पावसाचे पाणी, वाहणाऱ्या सांडपाण्याचा स्वतंत्र व कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
Source link
समस्या:अकोला बाजारच्या मुख्य रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, सिमेंट रस्त्यावर साचले सांडपाणी