.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच काही अनुचित प्रकार घडल्यास या प्रसंगाला पोलिसांनी कसे सामोरे जायचे व परिस्थिती कशी नियंत्रणात आणायची यासंदर्भात पंढरपूर शहर पोलिस ठाणे, पंढरपूर ग्रामीण व तालुका पोलिस ठाणे यांनी संयुक्तपणे रेल्वे मैदान पंढरपूर येथे मॉकड्रिल अर्थात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या वतीने ‘दंगल नियंत्रण योजने’अंतर्गत (मॉक ड्रिल) एक विशेष रंगीत तालीम घेण्यात आली. यामध्ये दहा पोलीस अधिकारी व ५५ ठाणे अंमलदार यांनी सहभाग घेतला होता.
प्रतिनिधी | पंढरपूर पंढरपूर शहर व तालुक्यात गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. रविवारी रात्रीपर्यंत शहर व तालुक्यातील ४२१ सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी करून श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. तालुक्यातील १०१ पैकी ८ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गणेश मंडळांनी पोलिसांकडे आवश्यक नोंदणी करून उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. नोंदणी करणाऱ्या मंडळांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. लाडक्या गणरायाचे आज आगमन होत असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ फुलली आहे. शहरातील विविध भागांत मंडप उभारण्यात आले आहेत. मंडळांकडून सजावट, विद्युत रोषणाई व धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असला, तरी यंदा दुष्काळामुळे बाजारपेठेत मात्र अपेक्षित गर्दी आणि उलाढाल दिसून येत नाही. गणेशमूर्तींच्या दरातही वाढ झाली असून, सजावटीचे साहित्यही महागले आहे. सोलापूर । लाडक्या श्री गणेशाच्या स्वागतासाठी घरोघरी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आतुरता लागली आहे. गणेश भक्तांकडून छोट्या मूर्तीला पसंदी होती.्र त्र बाजारपेठेत सर्वत्र पर्यावरणपूरक मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या दिसल्या. आज गणेश चतुर्थीनिमित्त गणेशमूर्ती १०० रुपयांपासून पाच हजारांपर्यंत मूर्ती चार इंचांपासून पाच फुटांपर्यंत विविध आकारांच्या गणेशमूर्ती उपलब्ध असून किंमत १०० रुपयांपासून सुमारे पाच हजार रुपयांपर्यंत होती.
प्रतिनिधी | बार्शी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रविवारी सकाळी शहरातील मुख्य मार्गावरून रूट मार्च काढण्यात आला. सदर रूट मार्च शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला. रूट मार्चमध्ये ५ पोलिस अधिकारी, ५२ पोलिस अंमलदार, एक एसआरपीएफ प्लाटूनचे २६ जवान, तसेच ४४ होमगार्ड असे सहभागी झाले होते. हे सर्व अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सव २०२६ करिता शहरांमध्ये बंदोबस्त करीत तैनात करण्यात येणार आहे. गणेशोत्सव २०२६ हा उत्सव शहरात शांततेत, उत्साहात व सुरक्षित वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सव काळात शहरातील गर्दी, वाहतूक व्यवस्था, गणेश मंडळांचे कार्यक्रम, मिरवणुका व विसर्जन सोहळा या वेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी बार्शी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने विशेष बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार डीजे, डॉल्बी वापराबाबत निर्बंध लागू आहेत.
उत्सव शांततेत पार पाडावा बार्शी शहर पोलिस ठाणे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव तत्पर असून, गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते आणि नागरिकांनी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. -गणेश कुंभार, पोलिस निरीक्षक, बार्शी