Headlines

बाप्पाच्या आगमनापूर्वी शेवगावात पोलिसांची ‘दक्ष’ पावले!:81 जवानांसह पोलिस-होमगार्ड सज्ज, उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन‎




गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण करण्यासाठी शनिवारी दुपारी शेवगाव शहरातून पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला. राज्य राखीव दलाच्या जवानांसह स्थानिक पोलिस आणि होमगार्डच्या पथकाने शहरातील प्रमुख बाजारपेठा, चौक व विविध भागांतून संचलन केले. पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार आणि पोलिस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली रूट मार्चचे आयोजन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी निर्भयपणे उत्सव साजरा करावा आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिस यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. शेवगाव पोलिस ठाण्याजवळील क्रांती चौकातून रूट मार्चला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठ, नाईकवाडी मोहल्ला, वडार गल्ली, मोची गल्ली, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मिरी रोडमार्गे संचलन करत पथक पुन्हा पोलिस ठाण्यात दाखल झाले. गर्दीच्या ठिकाणांसह विविध भागांतून झालेल्या या संचलनामुळे नागरिकांचे लक्ष वेधले गेले. रूट मार्चमध्ये राज्य राखीव दलाचे जवान तसेच कुसडगाव पोलिस निरीक्षक एस. डी. कराळे, उपनिरीक्षक एस. डी. कवठेकर यांच्यासह ८१ जवान सहभागी झाले. उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, विलास जाधव, रामहरी खेडकर, ४२ पोलिस अंमलदार आणि २५ होमगार्ड यांनीही सहभाग घेतला. गणेशोत्सव काळात सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून उत्सव शांततेत व सलोख्याच्या वातावरणात पार पाडावा, असे आवाहन पोलिसांनी केले. डीजेवर बंदी असल्याने मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. डीजेऐवजी पारंपरिक वाद्यांचा वापर करा ^गणेशोत्सव शांततेत आणि सलोख्याच्या वातावरणात पार पाडण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. उत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. डीजेला बंदी असल्याने गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मोहन बोरसे, पोलिस निरीक्षक, शेवगाव.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *