![]()
यांत्रिकीकरणामुळे शेतीतील बैलजोड्यांचा वापर दिवसेंदिवस कमी होत असला, तरी बैल आणि शेतकरी यांच्यातील नाते तसेच कृषी संस्कृतीची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खडकपुरा पोळा उत्सव समितीच्या वतीने पारंपरिक जागेवर आयोजित करण्यात आलेल्या पोळा महोत्सवात मोठ्या पोळ्यात बैलजोड्यांनी सहभाग घेतला, तर तान्ह्या पोळ्यात बालगोपालांनी विविध वेशभूषा, सामाजिक संदेश आणि पारंपरिक रूपातून उत्सवाची रंगत वाढवली. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या पोळ्यात सहभागी बैलजोड्यांसाठी विविध आकर्षक बक्षिसांची स्पर्धा घेण्यात आली. यात रोशन लांजेवार यांच्या बैलजोडीने प्रथम क्रमांकाचे, तर शुभम लाकडे यांच्या बैलजोडीने द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पटकावले. सहभागी बैलजोडीधारकांचा उत्साह वाढवण्यासाठी विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले. पोळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक बैलजोडीधारकास टोपी व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. तान्ह्या पोळ्यात बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध आकर्षक वेशभूषांसोबतच काही बालकांनी शेती आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणारे संदेशफलक हातात घेतले होते. काहींनी शेतकऱ्याची वेशभूषा केली, तर तुकाराम मुंढे, कांतारा, महादेव-पार्वती, श्री गणेश आदी व्यक्तिरेखांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शंकर-पार्वती व गणपतीची वेशभूषा साकारणाऱ्या अनय पुडके याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. तुकाराम मुंढे यांची भूमिका साकारणाऱ्या रुद्र भेंडे याने द्वितीय क्रमांक पटकावला, तर कांताराची भूमिका साकारणाऱ्या श्रीशा वाघ हिला विशेष बक्षीस व शिल्ड देऊन गौरविण्यात आले. तान्ह्या पोळ्यात सहभागी झालेल्या जवळपास ३० बालकांना विविध बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. परंपरेला आधुनिकतेची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे शहरात कृषी संस्कृतीचे वेगळे चित्र पाहायला मिळाले. पोळा उत्सव समितीच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा सन्मान राखण्यासोबतच बालगोपालांना आपल्या संस्कृतीशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी पोळा उत्सव समिती तसेच शहरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.
Source link
पोळ्याला आधुनिकतेची जोड देत जपली संस्कृती:खडकपुरा समितीतर्फे चांदूर रेल्वेत पोळा महोत्सव : बक्षिसे देत विद्यार्थ्यांचा केला गौरव