.


अहिल्यानगरचे ग्रामदैवत माळीवाडा येथील विशाल गणपतीचा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मंदिरातील विशाल गणपतीची हुबेहूब उत्सवमूर्ती उपलब्ध करून देण्यात आल्याने शहरासह परिसरातील सुमारे ४०० घरांमध्ये ‘विशाल’ बाप्पाची प्रतिष्ठापना झाली आहे. ग्रामदैवताचा उत्सव घराघरांत पोहोचला असून, विशाल गणपतीशी असलेली भाविकांची श्रद्धा यंदा अधिक व्यापक झाली आहे. दरम्यान, मंदिरात गणेश चतुर्थीपासून १२ दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अहिल्यानगरचे ग्रामदैवत असलेल्या माळीवाडा येथील विशाल गणपतीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविक उत्सव काळात दर्शनासाठी रांगा लावतात. गणेश चतुर्थीपासून १२ दिवस विविध धार्मिक विधी, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग, ढोलपथकांचे वादन आणि भजनसंध्यांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते १९ सप्टेंबरदरम्यान शहरातील विविध ढोलपथके मंदिर प्रांगणात वादनकला सादर करणार आहेत. याच कालावधीत विविध भजनी मंडळांकडून भजनसंध्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक उत्सवाबरोबरच घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर ग्रामदैवत विशाल गणेशाची लहान आकारातील हुबेहूब मूर्ती घरगुती उत्सवासाठी उपलब्ध करून दिले. सुमारे ४०० कुटुंबांनी यंदा या गणेशाची स्थापना केली आहे.
महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण २० सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती होणार आहे. २२ ते २४ सप्टेंबरदरम्यान वैभव अजय बोरुडे परिवाराच्या वतीने गणेशयाग आयोजित करण्यात आला आहे. नाशिकचे मुकुंदशास्त्री मुळे गुरुजी यांच्या पौरोहित्यात हा गणेशयाग होणार आहे.
विशाल गणपतीच्या जुन्या मंदिराचा १९९२ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला होता. तत्कालीन अध्यक्ष जगन्नाथ आगरकर होते. सर्व अहिल्यानगरकर तसेच गणेश भक्तांच्या वर्गणीतून आता उच्च प्रतिच्या मार्बलचे हे मंदिर उभे राहिले आहे. १२ दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पूर्वी हे मंदिर लाकडी खाबांचे होते. अंगारक चतुर्थी तसेच वर्षभरा येणाऱ्या चतूर्थीला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, अशी माहिती मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी दिली.