Headlines

जरांगे पिता-पुत्राची भेट:उपोषणाच्या आगीत होरपळलेला लेक; सुकलेली काया पाहून वडील रावसाहेब भावुक




मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पेटलेल्या संघर्षात आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार वाढला असला, तरी 19 दिवसांच्या प्रदीर्घ उपोषणामुळे त्यांची शारीरिक साथ सुटत चालली आहे. मुंबईच्या दिशेने सुरू असलेल्या जनसमुदायाच्या कूचादरम्यान बीडमधील पाटोदा येथे मुक्कामी असताना, जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेल्या त्यांच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. अंतरवाली सराटीवरून हजारो समर्थकांसह निघालेले मनोज जरांगे मंगळवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पाटोद्यात दाखल झाले. एवढ्या उशिराही त्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी चौकात जनसागर लोटला होता. प्रकृती चिंताजनक असतानाही जरांगे यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि पहाटे अडीच वाजेपर्यंत ही सभा सुरू होती. सभा आटोपल्यानंतर थकून व्यासपीठावरच निद्राधीन झालेल्या जरांगे यांची भेट घेण्यासाठी त्यांचे वडील रावसाहेब जरांगे तेथे पोहोचले. गेल्या काही दिवसांपासून उपोषणामुळे सुकलेली लेकाची काया आणि सलाईन घेण्यास केलेला नकार पाहून वडील रावसाहेब अत्यंत भावूक झाले. बराच वेळ शांतपणे झोपलेल्या मुलाकडे पाहत राहिल्यानंतर, त्यांना स्वतःचे सांत्वन करणे कठीण झाले. त्यांनी खाली वाकून मुलाच्या खांद्यावर डोके टेकवले आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बापाच्या डोळ्यांतील हे पाणी आणि हतबलता पाहून तेथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठा बांधवाचे डोळे पाणावले. अत्यंत व्याकुळ झालेल्या अवस्थेतच ते व्यासपीठावरून बाहेर पडले. दरम्यान, जरांगे यांची प्रकृती झपाट्याने खालावत असून, डॉक्टरांच्या पथकाने मध्यरात्री त्यांची वैद्यकीय तपासणी केली. मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी दोनदा अर्ज नाकारला असला, तरी जरांगे यांनी तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज दाखल करत आपला मार्ग स्पष्ट ठेवला आहे. शरीर उपोषणाच्या आगीत होरपळत असताना आणि वैद्यकीय मदत नाकारत असतानाही, मराठा आरक्षणाचा लढा मुंबईत पोहोचवण्याच्या ध्येयावर जरांगे पाटील अजूनही ठाम आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *