![]()
मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अशक्तपणामुळे त्यांना जागेवरून हलणेही कठीण झाल्याने, ते आज पाटोद्याहून (बीड) पुढच्या मुक्कामासाठी श्रीगोंद्याकडे रवाना होणार की तिथेच विश्रांती घेणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. एकीकडे त्यांच्या प्रकृतीमुळे प्रवासात अडथळा निर्माण झाला असताना, दुसरीकडे पोलिसांनी अद्याप त्यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी दिलेली नाही; याच पार्श्वभूमीवर, जरांगे पाटील मुंबईत पोहोचणारच नाहीत, असा दावा अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, जरांगे मुंबईत येणार नाहीत, डंके की चोट पे! एक गुपित सांगतो, जरांगे खूप शहाणा आहे. माल मोजून झाला की मुंबईला यायचंच नाही. आजारपण हे तर फक्त एक निमित्त आहे. रियॅलिटी शोच्या डायरेक्टर आणि प्रोड्युसरने आता हात वर केले आहेत. हा तर जनतेच्या सेन्सॉरचा आणि सदावर्तेंच्या हंटरचा करिश्मा आहे. गुपित सांगतो, जरांगेला कोर्टात यायचं नाहीये, फक्त न्यूज मीडियामध्ये बातम्या पसरावयाच्या आहेत. एक गुपित सांगतो, जरांगेंना मुंबईला यायचंच नाहीये, असे सदावर्ते यांनी म्हटले आहे. मनोज जरांगेंची शुगरची पातळी खालावली पाटोदा येथे वैद्यकीय पथकाने मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली असून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोळंके यांनी दिली आहे. तपासणीत त्यांचा रक्तदाब आणि साखरेची (शुगर) पातळी लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे आढळून आले आहे. शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन ते गंभीर डिहायड्रेशनच्या टप्प्याजवळ पोहोचल्यामुळे त्यांना तातडीने सलाईन लावण्यात आले आहे. आता त्यांच्या युरिन रिपोर्टनंतरच उपचाराबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे. डॉक्टरांनी जरांगे पाटील यांना रुग्णालयात दाखल करून योग्य उपचार घेण्याची आग्रहाची विनंती केली आहे. मात्र, ते अद्यापही उपचारास नकार देत आहेत. जर त्यांनी वेळेवर वैद्यकीय उपचार घेतले नाहीत, तर शरीरातील डिहायड्रेशन वाढून परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा स्पष्ट इशारा डॉक्टरांनी दिला आहे. तसेच, प्रकृती इतकी नाजूक असताना केवळ सलाईनच्या आधारावर त्यांना मुंबईपर्यंतचा पुढचा प्रवास करणे अजिबात शक्य नसल्याचेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पोलिसांनी आंदोलकांची माहिती मागितली आझाद मैदानावरील मराठा आंदोलनासाठी पोलिसांनी 50 आंदोलकांची सविस्तर माहिती मागितली आहे. यामध्ये आंदोलकांचे संपर्क क्रमांक, इतर वैयक्तिक माहिती आणि ते कोणत्या वाहनातून येणार आहेत, या सर्व तपशिलांचा समावेश आहे. या आंदोलनात सहभागी होणारे 50 जण नेमके कोण असतील, याचा निर्णय मनोज जरांगे पाटील घेणार असून त्यानंतर ही सर्व माहिती आझाद मैदान पोलीस ठाण्याला दिली जाईल. ही माहिती पोलिसांना सादर केल्यानंतरच ते या आंदोलनाला रीतसर परवानगी देणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
Source link
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली:आजारपण हे केवळ निमित्त, जरांगे मुंबईत येणारच नाहीत'; अॅड. गुणरत्न सदावर्तेंचा दावा