![]()
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात पांडरे एमआयडीसी परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह घरात टाकल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी माळेगाव पोलिसांनी गणेश रामचंद्र माने (वय २६, रा. पांडरे, ता. बारामती) याला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला १६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि तिचे पती तानाजी लक्ष्मण पवार हे पांडरे एमआयडीसी परिसरात वेगळे राहत होते. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी पावणेआठच्या सुमारास तानाजी पवार यांना त्यांच्या शेजाऱ्यांनी फोन करून पत्नी रडत असल्याचे सांगितले. त्यानंतर पवार घरी गेले असता, त्यांना त्यांची पत्नी खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळल्या. त्यांच्या डोक्यावर, मानेवर तसेच शरीराच्या इतर भागांवर जखमा असल्याचे पोलिस तपासात समोर आले. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेहाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पोलिसांनी परिसराची पाहणी करत संशयित गणेश माने याच्याबाबत माहिती मिळवली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने मृत महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर हातोड्याने हल्ला करून जखमी केले. जखमी अवस्थेतच त्याने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. महिलेने याला विरोध केल्यानंतर आणि ही घटना इतरांना सांगू नये यासाठी, आरोपीने टॉवेलच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केल्याचे तपासात समोर आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
Source link
पुण्यात महिलेचा खून करून मृतदेह घरात टाकला:आरोपीने हातोड्याने हल्ला करून गळा आवळला, पोलिस कोठडीत