![]()
गोंदिया जिल्ह्यात शेतात पिकांवर फवारणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ४८ वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र पटले असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आमगाव तालुक्यातील झालिया येथील शेतशिवारात ही घटना घडली. गणेशोत्सवाच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. नेमकं प्रकरण काय मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र पटले हे झालिया येथील त्यांच्या शेतात पिकांवर फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणीचे काम सुरू असतानाच परिसरातील मधमाशांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. मोठ्या संख्येने मधमाशांनी दंश केल्याने पटले गंभीर जखमी झाले. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर रवींद्र पटले शेतातच बेशुद्ध होऊन कोसळले. शेतातील इतर शेतकरी आणि मजुरांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी पटले यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी रुग्णालयात उपचार; मात्र मृत्यू गावकऱ्यांनी रवींद्र पटले यांना तातडीने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेमुळे पटले यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, झालिया परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा… गणेशोत्सवात भाविकांना त्रास नको, जरांगेंनी आंदोलनाला स्थगिती द्यावी:मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे आवाहन; सातारा-कोल्हापूर गॅझेटबाबत कायदेशीर पेच स्पष्ट मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघालेले आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर राज्य सरकारकडून समन्वयाची आणि सामंजस्याची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आली आहे. “सरकारने मराठा समाजाच्या बहुतांश सर्व मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू केली आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात हिंदू धर्माचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये लाखो भाविक रस्त्यावर असतात. त्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि उत्सवात व्यत्यय येऊ नये, म्हणून जरांगे यांनी गणेशोत्सव संपेपर्यंत आपले आंदोलन स्थगित करावे,” असे कळकळीचे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. पत्रकार परिषदेत विखे पाटील यांनी आंदोलनातील कायदेशीर अडचणी, गॅझेटची वस्तुस्थिती आणि नेत्यांवर वापरल्या जाणाऱ्या भाषेवर सविस्तर भाष्य केले. सविस्तर वाचा..
Source link
शेतात फवारणी करताना मधमाशांचा प्राणघातक हल्ला:गोंदियात 48 वर्षीय शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, परिसरात हळहळ