![]()
कन्नड सध्या संपूर्ण जग युद्धाच्या भीषण विळख्यात सापडले आहे. अशा काळात तथागत गौतम बुद्धांनी जगाला दिलेला मैत्रीचा अमूल्य संदेश अत्यंत प्रासंगिक ठरतो. जगाला युद्ध आणि दुःखमुक्त करण्यासाठी बुद्धांचा मैत्री विचार प्रत्येकाने प्रत्यक्ष आचरणात आणण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ज्ञ व सिन्नर येथील शिलिनी निसर्गोपचार सेवा केंद्राचे संचालक डॉ. अश्विन भडांगे यांनी केले. कन्नड शहरातील त्रिशरण बुद्ध विहारात वर्षावासानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. डॉ. भडांगे म्हणाले की, “मूठभरांच्या हव्यासापोटी जगावर युद्ध लादले जाते आणि यात निष्पाप सामान्य माणूस भरडला जातो. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे मानवी अस्तित्व धोक्यात आले असून पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने नेपाळमध्ये भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. हे रोखण्यासाठी बुद्धांची समता, करूणा आणि मैत्रीची शिकवण अत्यंत महत्त्वाची आहे. अमर्याद तृष्णा हेच सर्व दुःखांचे मूळ कारण असून, जगाला दुःखमुक्त करण्यासाठी बुद्धांचा विचार अंगीकारावाच लागेल. याच वेळी त्यांनी त्रिशरण बुद्ध विहारात सुसज्ज ग्रंथालय सुरू करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक त्रिशरण बुद्ध विहाराच्या व्यवस्थापक प्रा. प्रतिभा अहिरे यांनी केले. या सोहळ्याला ‘तिफण’चे संपादक डॉ. शिवाजी हुसे, माजी नगरसेवक रत्नाकर पंडित, डॉ. युसूफ शेख, प्रा. अलका गडकरी, आकाश बोलधने, गोकुळ राठोड, राजू शेख कमीटी, अनिल सिरसाठ, विनोद अंभोरे, जनाबाई जाधव यांच्यासह तारांगण अभ्यासिकेचे विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार इंजि. किरण राठोड यांनी मानले. यावेळी नागरिक उपस्थित होते. त्रिशरण बुद्धविहारात डॉ. भडांगे यांचा सत्कार करताना मान्यवर. बुद्धविहार हे सांस्कृतिक केंद्र ः अब्दुल जावेद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना नगरसेवक अब्दुल जावेद म्हणाले की, गौतम बुद्ध हे जगाचे आदर्श आहेत. भारताने जगाला बुद्धांसारखा शांतीचा विचार दिल्यामुळेच देशाला जागतिक पातळीवर आगळीवेगळी ओळख मिळाली आहे. त्रिशरण बुद्ध विहारात होणाऱ्या वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांमुळे हे केंद्र शहराचे मुख्य सांस्कृतिक केंद्र बनले आहे. यावेळी ठाणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सिरसाठ यांनीही आपले विचार मांडले.
Source link
बुद्धांचा मैत्री विचार आचरणात आणा- डाॅ. भडांगे:त्रिशरण बुद्धविहारात उपस्थित नागरिकांना केले मार्गदर्शन