Headlines

पुणेकरांनो लक्ष द्या:गणेशोत्सवातील देखाव्यांसाठी उद्यापासून मध्यभागातील प्रमुख रस्ते 5 नंतर बंद




गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन शुक्रवारपासून (18 सप्टेंबर) शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी 5 नंतर वाहतुकीसाठी बंद राहतील. लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता आणि टिळक रस्ता या प्रमुख रस्त्यांचा यात समावेश आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. घरगुती गणपती आणि गौरी विसर्जनानंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींच्या दर्शनासाठी आणि देखावे पाहण्यासाठी मोठी गर्दी होते. शुक्रवारपासून (18 सप्टेंबर) शहराच्या मध्यभागात गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. हे बदल विसर्जन मिरवणुकीपर्यंत लागू राहतील. अत्यावश्यक सेवेतील वाहने सोडून इतर सर्व वाहनांसाठी सायंकाळी 5 नंतर मध्यभागातील प्रमुख रस्ते बंद ठेवण्यात येतील. गर्दी कमी होईपर्यंत मुख्य रस्ते बंद राहतील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिसउपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी केले आहे. वाहतुकीसाठी बंद राहणारे प्रमुख रस्ते असे आहेत: लक्ष्मी रस्ता (हमजेखान चौक ते टिळक चौक), छत्रपती शिवाजी रस्ता (गाडगीळ पुतळा चौक ते देशभक्त केशवराव जेधे चौक, स्वारगेट), बाजीराव रस्ता (पूरम चौक ते अप्पा बळवंत चौक) आणि टिळक रस्ता (मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ते हिराबाग चौक). यासोबतच काही अंतर्गत रस्तेही बंद राहतील: सिंहगड गॅरेज (घोरपडे पेठ ते राष्ट्रभूषण चौक ते हिराबाग चौक), दिनकरराव जवळकर चौक ते पायगुडे चौक ते हिराबाग चौक, कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथ ते टिळक रस्ता, सणस रस्ता (गोटीराम भैय्या चौक, मंडई ते गोविंद हलवाई चौक), पानघंटी चौक ते गंज पेठ पोलिसचौकी, गंज पेठ ते वीर लहुजी वस्ताद तालीम चौक, गायकसाब मशीद ते सेंटर स्ट्रीट पोलिसचौकी (लष्कर), कोहिनूर चौक ते बाबाजान चौक (लष्कर), जेधे प्रासाद रस्ता, सुभानशाह दर्गा, पार्श्वनाथ चौक, शास्त्री चौक ते सोन्या मारुती चौक, गुरुनानक पथ ते हमजेखान चौक (देवजीबाबा चौक, गणेश पेठ). छत्रपती शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते मंडई, मंडई ते शनिपार, शनिपार ते फुटका बुरूज आणि अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक या भागात वाहने उभी करण्यास मनाई आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *