Headlines

चाकणच्या वाहतूक कोंडीवर जिल्हाधिकाऱ्यांचा ॲक्शन प्लॅन:रस्ते दुरुस्ती, पर्यायी मार्ग अन् आधुनिक तंत्रज्ञानावर भर




चाकण परिसरातील वाढती वाहतूक कोंडी, औद्योगिक वाहनांची वर्दळ, रस्त्यांवरील खड्डे आणि अनधिकृत वाहनतळांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विविध विभागांना निर्देश दिले आहेत. यावर समन्वयाने कृती आराखडा तयार करून त्याची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी, असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्ते दुरुस्तीसोबतच प्रमुख चौकांचे वाहतूक नियोजन, जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग, वाहनतळांची व्यवस्था आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने वाहतूक नियंत्रणावर विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात चाकण परिसरातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. या बैठकीला आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलिस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. चाकण परिसरातील नागरिकही यावेळी हजर होते. चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरी परिसरातील जोडरस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवून रस्ते वाहतुकीसाठी सुरळीत करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डुडी यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रलंबित रस्ते कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांचाही आढावा घेऊन दुरुस्ती करावी, असे त्यांनी सांगितले. वाहतूक नियंत्रणासाठी पारंपरिक उपायांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर देण्यात आला. प्रमुख चौकांवरील कॅमेऱ्यांचा वापर केवळ वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी न करता, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंड आकारण्यासाठी करावा. वाहतूक पोलिसांना स्थिर आणि फिरते कॅमेरे उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. चाकण चौकासह परिसरातील प्रमुख चौकांचे स्वतंत्र सर्वेक्षण करून वाहतुकीचा प्रवाह आणि पादचारी सुरक्षेचा विचार करून सुधारित आराखडा तयार करावा. आवश्यकतेनुसार उन्नत पादचारी मार्ग, भुयारी मार्ग, वाहतूक बेटे आणि सुरक्षित वळणमार्ग याबाबत तांत्रिक अभ्यास करावा, असेही त्यांनी नमूद केले. रस्त्यांवरील अनधिकृत वाहनतळांविरोधात टोईंग वाहनांच्या मदतीने वाहने हटवणे, दंड आकारणे आणि गरज पडल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी, अशा सूचना देण्यात आल्या. औद्योगिक कंपन्या आणि वाहतूक संघटनांनी त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र वाहनतळ किंवा थांबण्याची व्यवस्था करावी. परिसरातील मोकळ्या जागा शोधून वाहनतळांची व्यवस्था करावी आणि त्यावर प्रत्यक्ष वेळेतील देखरेख व्यवस्था विकसित करावी, असे जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *