Headlines

मराठीच्या सक्तीवरून रिक्षाचालक युनियन आक्रमक:4 मे पासून 15 लाख चालकांचा राज्यव्यापी संपाचा इशारा, 28 एप्रिलला अल्टिमेटम




राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून आता मोठा पेच निर्माण झाला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असतानाच, रिक्षाचालकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने याविरोधात एल्गार पुकारला आहे. या नियमाच्या निषेधार्थ ४ मे पासून राज्यातील तब्बल १५ लाख रिक्षाचालक बेमुदत संपावर जाण्याची शक्यता आहे. परिवहन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, आता परवाना (Permit) मिळवण्यासाठी आणि रिक्षा-टॅक्सी चालवण्यासाठी चालकाला मराठी भाषा येणे बंधनकारक आहे. १ मे (महाराष्ट्र दिन) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. नियम न पाळणाऱ्या आणि मराठी येत नसलेल्या चालकांविरुद्ध १ मे पासून राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबवून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ४ मे पासून १५ लाख चाकं थांबणार? ‘मुंबई ऑटोरिक्षा मेन्स युनियन’ने सरकारच्या या ‘मराठी सक्ती’च्या धोरणाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. ४ मे पासून पुकारण्यात आलेल्या या संपामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होतील. एकट्या मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) ५ लाख चालक संपावर जाणार असल्याने चाकरमान्यांचे प्रचंड हाल होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आदेश मागे घ्या, अन्यथा रोज निदर्शने; युनियनचा इशारा रिक्षाचालक संघटनांच्या मते, भाषेची अट लादणे हे अन्यायकारक आहे. युनियनच्या नेत्यांनी म्हटले आहे की, सरकारने हा आदेश तातडीने मागे न घेतल्यास केवळ संपच नाही, तर दररोज तीव्र निदर्शने केली जातील. दरम्यान, संपावर जाण्यापूर्वी युनियनचे शिष्टमंडळ परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन देणार आहे. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने या संबंधीचे वृत्त दिले आहे. प्रवाशांची कोंडी होण्याची शक्यता महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरू होणाऱ्या या वादाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे. जर सरकारने माघार घेतली नाही, तर रस्त्यांवरील रिक्षांची संख्या लक्षणीयरीत्या घटणार आहे. या मुद्द्यावर तोडगा न निघाल्यास रेल्वे स्थानके, बस डेपो आणि विमानतळाबाहेर प्रवाशांची मोठी गैरसोय होऊ शकते. आता २८ एप्रिलला होणाऱ्या बैठकीत परिवहन मंत्री संघटनांची मागणी मान्य करतात की आपल्या निर्णयावर ठाम राहतात, यावर ४ मे चा संप अवलंबून असणार आहे. हे ही वाचा… घाटीत परिचारिकांचा बेमुदत संप सुरू:पहिल्याच दिवशी रुग्णसेवा विस्कळीत, प्रशासनाची धावपळ छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथील परिचारिकांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे पहिल्याच दिवशी रुग्णालयातील रुग्णसेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. पाचशेहून अधिक परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *