![]()
पवई येथील नामांकित आयआयटी मुंबई (IIT Bombay) मध्ये एका बी.टेक. विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. या विद्यार्थ्याने कॉलेजच्या हॉस्टेल नंबर ४ मध्ये टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेम
.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा विद्यार्थी बी.टेक. अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत होता. नुकत्याच झालेल्या एका परीक्षेदरम्यान तो कथितरीत्या कॉपी करताना पकडला गेला होता. याप्रकरणी त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शिक्षकांकडून त्याला सांगण्यात आले होते. या कारवाईच्या भीतीने आणि तणावाखाली असलेल्या या विद्यार्थ्याने हॉस्टेल गाठले आणि तिथेच सायंकाळी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
या मृत्यूची बातमी कॅम्पसमध्ये पसरताच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आक्रमक पवित्रा घेतला. गेल्या काही वर्षांत आयआयटी मुंबईमध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या अनेक घटना घडल्याने विद्यार्थ्यांचा रोष उफाळून आला. संतप्त विद्यार्थ्यांनी आयआयटी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले व या घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही. कथित कॉपी प्रकरणाचा आणि या मृत्यूचा थेट संबंध आहे का, याचा सखोल तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. आयआयटी प्रशासन आणि पोलीस या संपूर्ण घटनेची सविस्तर चौकशी करत असून, या संवेदनशील प्रकरणात पुढे नेमकी काय कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.