Headlines

सावळा गोंधळ:इगतपुरीत दूरच्या गावांशी आरोग्य केंद्रांची जोडणी; रुग्णांना 20 ते 30 किमीचा फेरा




इगतपुरी तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांना जोडण्यात आलेल्या गावांच्या भौगोलिक रचनेचा योग्य विचार न झाल्याने नागरिकांना उपचारासाठी २० ते ३० किलोमीटरचा अनावश्यक प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील नांदगाव सदो, काननवाडी, काळुस्ते, खेड, वैतरणा, धामणगाव, वाडीवऱ्हे आणि बेलगाव कुऱ्हे या आठही प्राथमिक आरोग्य केंद्रांना जोडलेल्या गावांचा व भौगोलिक अंतराचा तातडीने फेरआढावा घेण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. यामध्ये काननवाडी केंद्राचा सावळागोंधळ अधिक समोर आला आहे. काननवाडीत स्वतःचे केंद्र उपलब्ध असतानाही खुद्द काननवाडी गावाला खेड प्राथमिक आरोग्य केंद्राशी जोडण्यात आले आहे; तर काननवाडी केंद्राला घराजवळील बेलगाव कुऱ्हे गावे देण्याऐवजी घोटी बु., बालयदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी, कावनई, बिटुर्ली, माणिकखांब, टाकेघोटी, खांबाळे, अडवण आणि वाकी ही लांबची गावे जोडली गेली आहेत. या गावांना घोटी अथवा इगतपुरी ग्रामीण रुग्णालय अधिक सोयीचे आहे. अशीच स्थिती काळुस्ते केंद्राची असून, तेथे कुरुंगवाडी, पिंपळगाव मोरे, उभाडे, दौंडत, उंबरकोन, भरवज आणि निरपान ही गावे जोडल्याने रुग्णांना २० ते २५ किमी अंतर कापावे लागते. तसेच खेड केंद्राला आंबेवाडी व मांजर्गावसारखी लांब पल्ल्याची गावे जोडल्याने आपत्कालीन स्थितीत रुग्ण, गर्भवती व वृद्धांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे गावांचे अंतर, रस्त्यांची स्थिती व लोकसंख्या विचारात घेऊन केंद्रांची फेररचना करण्याची मागणी होत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांना गावांची जोडणी करताना भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास हवा. नागरिकांना उपचारासाठी अनावश्यक २० ते ३० किमी प्रवास करावा लागू नये. रस्ते व वाहतुकीचा विचार करून सर्वात जवळचे केंद्र निश्चित करत गावांची नव्याने शास्त्रीय पुनर्रचना करावी. – संदीप किर्वे, जिल्हाध्यक्ष, मनसे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *