![]()
उच्च न्यायालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रमाणेच दुय्यम न्यायालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही सुधारित वेतनश्रेणीचा लाभ मिळावा, या प्रमुख मागणीसाठी चांदवड न्यायालयातील सर्व न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १६) काळ्या फिती लावून तीव्र निषेध नोंदवला. कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कार्यालयीन कामकाजाचा कोणताही खोळंबा होऊ न देता काळ्या फिती लावून कर्तव्य बजावत आंदोलन केले. उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयातील वेतन व इतर भत्त्यांमधील विसंगती दूर करून कायमस्वरूपी धोरण निश्चित करावे तसेच सुधारित वेतनश्रेणीचा लाभ १ जानेवारी २००६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावा, या मागणीसाठी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचारी वेल्फेअर असोसिएशन नाशिकच्या वतीने उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, महाप्रबंधक, मुख्यमंत्री, विधी व न्याय विभाग सचिव तसेच वित्त विभाग सचिव यांना निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन, रजा रोखीकरण, उपदान आणि इतर आर्थिक लाभांचा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी महालेखाकार कार्यालयास पाठवावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.उच्च न्यायालय आणि दुय्यम न्यायालयातील वेतनमानात होणारा भेदभाव दूर करून कायमस्वरूपी ठोस धोरण निश्चित करावे, अशी आग्रही भूमिका या आंदोलनाद्वारे मांडण्यात आली आहे. शासनाने व प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक तसेच तातडीने पावले न उचलल्यास आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. या आंदोलनात चांदवड न्यायालयातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
Source link
दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी त्वरित लागू करा:चांदवडला प्रलंबित मागणीसाठी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज