Headlines

कथा मनात रुजवा… मगच श्रोत्यांच्या मनात उतरवा..!:48 प्रशिक्षणार्थींना कथाकथनकार कौस्तुभ केळकर यांनी दिले प्रभावी कथाकथनाचे धडे‎




उत्कृष्ट कथाकथनासाठी सर्वप्रथम चांगला श्रोता असणे गरजेचे आहे. ज्याला गोष्ट चांगली ऐकता येते, तोच ती प्रभावीपणे सांगू शकतो. कथाकथन ही केवळ शब्दांची जुळवाजुळव नसून आवाजातील चढ-उतार, देहबोली आणि भावभावनांचा सुंदर मिलाफ आहे, अशा शब्दात कथाकथनकार कौस्तुभ केळकर यांनी प्रशिक्षणार्थींना कथाकथनाचे विविध पैलू समजावून सांगितले. ज्येष्ठ कथालेखक कै. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कार भारतीतर्फे आयोजित ‘कथाकथी २६’ कथाकथन कार्यशाळा आयुर्वेद व्यासपीठ, धर्माधिकारी मळा येथे उत्साहात झाली. जिल्ह्यातील ४८ प्रशिक्षणार्थींनी कार्यशाळेत सहभाग घेतला. उद्घाटनप्रसंगी आयुर्वेद व्यासपीठचे अध्यक्ष वैद्य मंदार भणगे उपस्थित होते. साहित्य विधा संयोजक माधवी ऋषी यांनी संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. सचिव स्नेहल झांबरे यांनी संस्थेची माहिती व आगामी उपक्रमांचा आढावा दिला. कथाकथनकार कौस्तुभ केळकर म्हणाले, निवडलेली कथा किमान १५ ते २० वेळा वाचल्याने तिचा आशय मनात रुजतो आणि कथाकथन करताना आत्मविश्वास वाढतो. वेळेचे नियोजन, देहबोली, चेहऱ्यावरील आत्मविश्वास, प्रेक्षकांशी संवाद आणि आवाजाचा व्यायाम याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच अचानक दिलेल्या विषयावर कथा तयार करून सादर करण्याची प्रात्यक्षिके प्रशिक्षणार्थींकडून करून घेतली. समितीचे अध्यक्ष ॲड. दीपक शर्मा यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संगीत विधा संयोजिका अपर्णा बालटे यांनी केले, तर उपक्रम प्रमुख तेजस अतीतकर यांनी आभार मानले. रघुनाथ सातपुते, नंदकुमार देशपांडे, सुनीता शर्मा, डॉ. विजयकुमार जोशी, अरुण झंवर, अनंत जोशी, विद्या जोशी, रोहिणी आढे, तेजा पाठक, वर्षा आढाव, आसावरी नातू आदी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *