![]()
महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाचे भीषण सावट पसरले आहे. शेतात उभी असलेली खरीप पिके डोळ्यांदेखत करपून गेली असून, बळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरळत आहेत. शेतकरी सरकारकडून तत्काळ दुष्काळ जाहीर होण्याची आणि आर्थिक मदतीची चातकासारखी वाट पाहत असतानाच, नांदेडमध्ये राज्यकर्त्यांच्या असंवेदनशीलतेचे संतापजनक आणि चीड आणणारे दर्शन घडले आहे. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित उच्चस्तरीय बैठकीत चक्क मंत्री, खासदार आणि आमदारांसाठी काजू-बदामाचा शाही पाहुणचार ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बैठकीत लोकप्रतिनिधी काजू-बदामावर ताव मारत दुष्काळाची चर्चा करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दुष्काळाची गंभीर चर्चा आणि लोकप्रतिनिधींचा शाही खुराक नांदेड येथे मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री अतुल सावे, राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार रवींद्र चव्हाण, परभणीचे खासदार संजय जाधव, खासदार रामराव वडकुते, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, खासदार कल्याण काळे, खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्यासह आमदार प्रताप पाटील चिखलीकर, हेमंत पाटील, चंद्रकांत नवघरे, बाबुराव पाटील कोहळीकर, कैलास पाटील, अमर राजूरकर आणि अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते. भाजपचे खासदार अशोक चव्हाण हेदेखील ऑनलाइन पद्धतीने या बैठकीत सहभागी झाले होते. मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील तीव्र पाणीटंचाई, करपलेली पिके आणि जनावरांच्या चाऱ्याच्या गंभीर समस्येवर चर्चा सुरू असतानाच, समोर ठेवलेल्या सुकामेव्याच्या (काजू-बदाम) वाट्यांवर लोकप्रतिनिधींनी हात साफ करण्यास सुरुवात केली. परभणीचे खासदार संजय जाधव हे बदाम खाण्यात मश्गूल असल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला. हा प्रकार लक्षात येताच राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना देऊन काजू-बदामाच्या प्लेट्स टेबलावरून हटवण्यास सांगितले. मात्र, तोपर्यंत या प्रकाराचे चित्रीकरण बाहेर आले आणि सोशल मीडियावर या असंवेदनशीलतेची जोरदार चर्चा सुरू झाली. अधिकाऱ्यांना डोकं आहे का?; मंत्री संजय शिरसाट यांचा संताप या प्रकारावर सत्ताधारी पक्षातूनही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या संपूर्ण घटनेवर अधिकाऱ्यांची जोरदार कानउघाडणी केली. “अधिकाऱ्यांना अजिबात डोकं नाहीये का? कोणत्या विषयावर बैठक सुरू आहे आणि आपण तिथे काय पाहुणचार ठेवतोय, याचे भान अधिकाऱ्यांना असायला हवे होते.” “कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दुष्काळाची पाहणी करून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. परंतु, अधिकाऱ्यांच्या अशा मूर्खपणाच्या कृतींमुळे सरकार आणि मंत्री बदनाम होतात,” असा संतप्त सवाल शिरसाट यांनी उपस्थित केला. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा कारभार; अंबादास दानवे यांचा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकारावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. “राज्यात शेतकरी पाण्याअभावी, विजेअभावी आणि पिके जळाल्यामुळे हवालदिल झाला आहे. कर्जाच्या विळख्यात शेतकरी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असताना, दुष्काळाच्या बैठकीत बसून काजू-बदाम चघळणे म्हणजे शेतकऱ्यांच्या दुःखाची क्रूर थट्टा आहे.” “शेजारच्या कर्नाटक सरकारने तत्काळ निर्णय घेत दुष्काळ जाहीर केला; परंतु महाराष्ट्रातील निष्क्रिय सरकार केवळ बैठकांचे सोपस्कार करत मुहूर्त शोधत बसले आहे. सरकारने तोंडदेखलेपणा बंद करून तातडीने दुष्काळ जाहीर करावा आणि बाधित शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी,” अशी आक्रमक मागणी दानवे यांनी केली. बळीराजाच्या भावनांशी खेळ मराठवाड्यात महिना-दीड महिन्यापासून पावसाचा खंड पडल्याने विहिरी आटल्या आहेत आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. एकीकडे सामान्य शेतकरी जगायचे कसे या विवंचनेत असताना, दुसरीकडे त्यांच्याच नावाने भरवलेल्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी दाखवलेली ही उदासीनता आणि शाही थाट जनतेच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या घटनेमुळे प्रशासनाचा ढिसाळपणा आणि लोकप्रतिनिधींचे गांभीर्य पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. —————— हेही वाचा… कणकवलीतले खून पचवण्यासाठी यांना सत्ता हवी! : दिशा प्रकरणात ठाकरे कुटुंबावर चिखलफेकीसाठी अर्थपुरवठा कोठून होतोय? संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल “दिशा सालियन प्रकरणात केवळ ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करून प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही लोकांना हाताशी धरून हा घाणेरडा राजकीय खेळ सुरू आहे. अब्रूची भाषा बोलणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, आमचीही प्रतिष्ठा आणि मानमर्यादा आहे. कोणाच्या तरी हातचे बाहुले बनून आरोप करणाऱ्यांच्या पाठीशी कोणती अदृश्य शक्ती आहे आणि या संपूर्ण प्रकरणासाठी अर्थपुरवठा कुठून केला जातोय, हे आम्हाला पक्के ठाऊक आहे,” असा सणसणीत प्रतिहल्ला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी चढवला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अन् दुष्काळाच्या बैठकीत नेत्यांचा काजू-बदामावर ताव!:नांदेडमधील आढावा बैठकीतील प्रकाराने सरकारवर टीकेची झोड