![]()
लोहगडावरून पडून मृत्यू झाल्याचे सुरुवातीला समोर आलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी आढळून आल्या आहेत. केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल, तिचा मित्र चेतन चौधरी आणि रितेश हांगे या तिघांविरोधात पोलिसांनी तब्बल 5053 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या दोषारोपपत्रातून हत्येपूर्वीची रेकी, बनावट सोशल मीडिया अकाउंट, केतनला लोहगडावर आणण्यासाठी आखलेला कट आणि हत्येपूर्वी करण्यात आलेली तयारी याबाबतची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या तपासानुसार, केतनला ठार करण्याचा कट अचानक रचण्यात आलेला नव्हता. मार्च 2026 पासूनच या कटाची तयारी सुरू झाली होती, तर मे महिन्यात हत्येचा अंतिम आराखडा तयार करण्यात आला. सुरुवातीला केतनला ठार न करता त्याला गंभीर दुखापत करून अपंग करण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करण्यात आला होता. यासाठी परराज्यातील काही व्यक्तींशी संपर्कही करण्यात आल्याचे तपासात समोर आले. मात्र, बाहेरील व्यक्ती पोलिसांच्या हाती लागल्यास संपूर्ण कट उघड होण्याची भीती व्यक्त झाल्यानंतर हा पर्याय सोडण्यात आला. या संपर्कातील एका व्यक्तीला पोलिसांनी साक्षीदार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. लोहगडाआधी लोणावळ्यातील डोंगरांची रेकी केतनच्या हत्येसाठी योग्य ठिकाण शोधताना आरोपींनी लोणावळ्यातील विविध डोंगर परिसरांची पाहणी केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. मे महिन्याच्या अखेरीस सिया आणि चेतन लोणावळ्यात गेले होते. यावेळी त्यांनी टायगर पॉईंटसह काही ठिकाणांची रेकी केली. टायगर पॉईंट परिसरात सीसीटीव्हीची उपलब्धता नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. अखेर लोहगडाची निवड करण्यात आली. यामागेही विशिष्ट कारण असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले. मार्च 2025 मध्ये लोहगडावर एका महिलेचा मृत्यू झाला होता. त्यामुळे याच परिसरात केतनचा मृत्यू झाल्यास तो सेल्फी घेताना किंवा पाय घसरल्याने दरीत पडल्याचा भास निर्माण करता येईल, असा विचार आरोपींनी केल्याचे तपासात समोर आले आहे. 4 जूनचा प्रयत्न फसला; बालीचा प्लॅनही हाणून पाडला 4 जून रोजी सियाने केतनसोबत लोहगडावर जाण्याचा आग्रह धरला होता. मात्र, त्यावेळी हत्येचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यानंतर 6 जून रोजी केतन आणि सिया प्री-वेडिंग शूटसाठी बालीला जाणार होते. मात्र, प्रवासादरम्यान खालापूरमधील एका कॅफेत थांबले असताना सियाने केतनचा पासपोर्ट फाडून टाकल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे बालीचा प्रवास रद्द झाला. यानंतर 14 जून रोजी सिया आणि केतन पुन्हा लोहगडावर गेले. यावेळी सियाने केतनला ढकलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. मात्र, केतन दरीत पडला नाही. त्यानंतर सियाने परिसरात साप असल्याचे सांगून केतनला घाबरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या प्रयत्नातही केतनचा मृत्यू झाला नाही. ‘माही’ नावाच्या बनावट अकाउंटमधून केतनशी संपर्क पहिले प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर आरोपींनी केतनला पुन्हा लोहगडावर आणण्यासाठी वेगळा मार्ग अवलंबल्याचे तपासात समोर आले आहे. तिघांनी मिळून ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट तयार केले. या अकाउंटसाठी एका परिचित तरुणीचा फोटो वापरण्यात आल्याची माहिती आहे. 18 जून रोजी या अकाउंटच्या माध्यमातून केतनशी संपर्क करण्यात आला. आपण सियाची मैत्रीण असल्याचे भासवून तिला वाढदिवसानिमित्त सरप्राईज देण्यासाठी केतनने सियाला घेऊन लोहगडावर यावे, असा संदेश पाठवण्यात आला. तपासानुसार, केतनला लोहगडावर आणण्याच्या या योजनेत रितेश हांगेची भूमिका असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. मंदिराजवळ थांबला चेतन; केतनला दरीत ढकलल्याचा आरोप ठरलेल्या योजनेनुसार चेतन चौधरी वेगळ्या मार्गाने लोहगडावर गेला आणि गडावरील मंदिराजवळ जाऊन थांबला. सिया आणि केतन तेथे पोहोचल्यानंतर सियाने चेतनला पुढे जाण्याची खूण केल्याचे तपासात समोर आले आहे. यानंतर केतनचे लक्ष नसताना त्याला मागून धक्का देण्यात आला. पोलिसांच्या तपासानुसार, सियाने त्याच्या खांद्याला धक्का दिला, तर चेतनने त्याच्या पायाला धक्का दिला. त्यानंतर चेतनने लाथ मारल्याने केतन दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला, असा दावा दोषारोपपत्रातील तपासाच्या निष्कर्षांमध्ये करण्यात आला आहे. या संपूर्ण कटाचा सूत्रधार रितेश हांगे असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे. हत्येनंतर ‘माही’ नावाचे बनावट इन्स्टाग्राम अकाउंटही डिलीट करण्यात आले. हत्येवरील सिनेमे, पॉडकास्ट आणि सोनम रघुवंशी प्रकरणाचा अभ्यास पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. हत्येची योजना आखताना आरोपींनी या प्रकाराशी संबंधित चित्रपट पाहिल्याचे आणि पोलिसांपासून तपासाची दिशा कशी चुकवता येईल, यासंदर्भातील पॉडकास्ट ऐकल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. तसेच मेघालयातील सोनम रघुवंशी प्रकरणाशी संबंधित माहितीचाही अभ्यास करण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. दोषारोपपत्रानुसार, हत्येपूर्वी ठिकाणांची पाहणी, घटनाक्रमाचा विचार, केतनला लोहगडावर आणण्यासाठी बनावट सोशल मीडिया अकाउंटचा वापर आणि त्यानंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न अशा विविध टप्प्यांतून हा कट पुढे नेण्यात आला. 5 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि 5053 पानांचे दोषारोपपत्र या प्रकरणात पोलिसांनी पाच प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. याशिवाय आरोपींच्या हालचाली, रेकी, सोशल मीडिया अकाउंट, हत्येपूर्वीचे नियोजन आणि कटाशी संबंधित इतर बाबींचा तपशील दोषारोपपत्रात समाविष्ट करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात एकूण 5053 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे सुरुवातीला अपघाती मृत्यू वाटणाऱ्या या घटनेमागे नेमके काय घडले, याचे अनेक स्तर तपासातून समोर आले आहेत. हेही वाचा… नागपूरच्या इंदोरा-दिघोरी उड्डाणपुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव:देवेंद्र फडणवीस-नितीन गडकरींच्या उपस्थितीत लोकार्पण नागपूरमधील इंदोरा ते दिघोरीदरम्यानच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आले आहे. शहरातील हा सर्वात लांब उड्डाणपूल असून, त्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पहिले सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. सविस्तर वाचा…
Source link
केतन अग्रवाल हत्येचा थरारक घटनाक्रम समोर:फेक अकाउंट, हत्येवरील सिनेमे अन् सोनम रघुवंशी प्रकरणाचा अभ्यास, 5,053 पानी दोषारोपपत्रातून धक्कादायक खुलासा