![]()
तिवसा तालुक्यात दीड महिन्यापासून पाऊस नसल्याने सोयाबीनचे पीक करपले आहे. सरकारच्या उदासीन कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. याच दरम्यान, ‘पालकमंत्री आणि आमदारांचा शेताच्या बांधावरील फोटो दाखवा आणि रोख बक्षीस मिळवा’ असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी केले होते. या आवाहनानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तिवस्याचा दौरा केला. मात्र, महामार्गालगतच्या शेतात पोहोचताच संतप्त शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला. सोयाबीन हे शेतकऱ्यांचे महत्त्वाचे नगदी पीक आहे, ज्यावर त्यांची दसरा-दिवाळी अवलंबून असते. मात्र, करपलेल्या पिकांकडे लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने प्रशांत कांबळे यांनी हे उपरोधिक आंदोलन सुरू केले होते. पालकमंत्र्यांचा दौरा केवळ औपचारिकता आणि घाईचा असल्याचे दिसताच, सार्सी व शिरजगाव मोझरी परिसरातील शेतकरी आणि तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रुक आणि मार्डी या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांसमोर पिकांच्या नुकसानीची माहिती दिली. प्रशांत कांबळे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी मागील वर्षीची अतिवृष्टी आणि यंदाच्या दुष्काळामुळे झालेल्या दुहेरी संकटाची कैफियत मांडली. त्यांनी सरकारकडे तात्काळ हेक्टरी १ लाख रुपयांची मदत आणि दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. सरकारने हे दौरे थांबवून तातडीने मदत न दिल्यास आंदोलन जिल्ह्यात पसरेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. या घेरावावेळी तालुका काँग्रेस पदाधिकारी विश्वजीत बाखडे, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष सुनील बाखडे, शशांक राऊत, संजय चौधरी, मनोज डीगांबरे, संदीप हगवणे, गौरव चौधरी, सर्जा वाघमारे, आकाश माहोरे, पुरुषोत्तम मेश्राम, आकाश मकेश्वर, निलेश गुडधे, प्रवीण देशमुख, रवींद्र बनकर, अभिजित साबळे, श्रीधर कोहळे, संदीप वानखडे, रमेश कोहळे, अमोल काळे यांच्यासह अनेक शेतकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. शेतकऱ्यांनी यावेळी सरकारकडे काही प्रमुख मागण्या केल्या. त्या खालीलप्रमाणे आहेत: तिवसा तालुका तातडीने ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करावा. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत द्यावी. अमरावती जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी लागू करावी. महसुली व पीक कर्जाच्या वसुलीस त्वरित स्थगिती देऊन बांधावर जाऊन पंचनामे करावेत.
Source link
तिवस्यात पालकमंत्र्यांना संतप्त शेतकरी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घातला:दीड महिन्याच्या पावसाअभावी सोयाबीन नुकसानीवर 'फोटो दाखवा, बक्षीस मिळवा' आंदोलनानंतर मागण्या मांडल्या