Headlines

जालना रोडवर 4 पुलांसाठी केलेला 135 कोटींचा खर्च वाया जाणार:नव्या पुलासाठी संभाजीनगरातील 4 उड्डाणपूल पाडणार- शिरसाट




शेंद्रा ते बजाजनगर (ओॲसिस चौक) असा मराठवाड्यातील सर्वाधिक लांबीचा अखंड उड्डाणपूल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन कार्यक्रमात केली. त्यावर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी माहिती दिली की, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अखंड पूल गरजेचा आहे. याचा डीपीआर तयार झाला असून या कामाचे ४ हजार कोटींचे टेंडर येत्या ३ महिन्यांत निघेल. नवा पूल उभारण्यासाठी जालना रोडवर पुढील ८० ते १०० वर्षांचा विचार करून बांधलेले सुमारे १३५ कोटींचे ४ उड्डाणपूल अवघ्या १० ते १५ वर्षांच्या आतच पाडावे लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले. जालना रोडवरील कोंडी फोडण्यासाठी १९८५ ते २०१५ या काळात सिडको बसस्थानक, मोंढा नाका, क्रांती चौक आणि महावीर चौक येथे चार उड्डाणपूल उभारण्यात आले होते. ५०० ते १ हजार मीटर लांबीच्या आणि १२ ते १५ मीटर रुंदीच्या या पुलांसाठी तत्कालीन प्रशासनाने सुमारे १३५ कोटी रुपये खर्च केले होते. अखंड उड्डाणपुलाचा आधीच्या पुलावेळी विचार आवश्यक होता अखंड उड्डाणपूल गरजेचाच आहे. सध्याचे ४ पूल बांधतानाच पुढील १०० वर्षांचा विचार केला असता तर आता हे पूल पाडण्याची आवश्यकता कदाचित पडली नसती. मात्र, आमच्या क्षेत्रामध्ये बेनिफिट कॉस्ट रेशोचा विचार केला जातो. यामुळे खर्चापेक्षा नागरिकांना किती फायदा होतो हे महत्त्वाचे आहे. अखंड पुलामुळे जालना रोडवरील वरची वाहतूक सुटेल, पण पुलाखालील शहरांतर्गत रस्ते ब्लॉक होतील. – प्रा. डॉ. राजाराम दमगीर, निवृत्त स्थापत्य विभागप्रमुख, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पाडापाडीमुळे मरण यातनांचे संकट सेव्हन हिल्स येथे उड्डाणपूल बांधण्यात आला होता. कोणताही पूल किमान १०० वर्षांचा विचार करून बांधला जातो. मात्र, अवघ्या १५ वर्षांतच हे पूल ‘अपुरे’ ठरवून पाडण्याची वेळ आली आहे. ही तत्कालीन प्रशासकीय दूरदृष्टीची दिवाळखोरीच असून आता हे पूल पाडण्यासाठी पुन्हा जनतेचा पैसा आणि वेळ खर्च होणार आहे. यासोबतच आगामी किमान ५ वर्षे संपूर्ण शहराला ट्रॅफिक जामच्या मरणयातना सोसाव्या लागणार आहेत. क्रांती चौकातील शिवरायांच्या पुतळ्याचा पेच निर्माण होणार २०१२ मध्ये तयार झालेल्या जुन्या उड्डाणपुलामुळे शिवरायांचा पुतळा झाकत होता. त्यावर शिवप्रेमींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. म्हणून नुकतेच कोट्यवधी रुपये खर्चून चौथऱ्याची उंची वाढवत महाराजांचा भव्य पुतळा बसवण्यात आला. विशेष म्हणजे पुतळ्याच्या दोन्ही बाजूंनी उड्डाणपूल तयार करण्यात आला होता. आता जुना पूल पाडून त्याच्या जागी अधिक उंच, रुंद आणि अखंड असा नवा उड्डाणपूल आल्यास महाराजांचा पुतळा पुन्हा या नव्या पुलाखाली जाणार का? डीपीआर बनवताना या अत्यंत संवेदनशील आणि भावनिक मुद्द्याचा विचार करून आताच्यासारखाच उड्डाणपूल दोन्ही बाजूंनी करणार का, हा मोठा प्रश्न असणार आहे. सर्वात महत्त्वाच्या जालना रोडवर दररोज ३ लाख वाहनांची वर्दळ शेंद्रापासून वाळूजपर्यंत असलेला जालना रोड हा शहराचा मुख्य कणा आहे. सध्या या मार्गावरून दररोज २.५ ते ३ लाख वाहने धावतात. यात सर्वाधिक ६०% दुचाकी, २०% कार, १०% रिक्षा आणि १०% अवजड वाहनांचा समावेश आहे. पीक अवर्समध्ये दर तासाला हजारो वाहने येथून ये-जा करतात. जुने पूल पाडणे आणि ४ हजार कोटींचा अखंड पूल उभारणे या प्रक्रियेला किमान ३ ते ५ वर्षे लागतील. या काळात जालना रोडवरील प्रचंड वाहतूक पर्यायी मार्गावर वळवताना शहराचा श्वास कोंडणार आहे. अगोदरच अरुंद असलेले शहरांतर्गत रस्ते या ट्रॅफिकचा ताण कसा सहन करणार, हा प्रश्न असल्याचे वाहतूक शाखेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *