![]()
बागलाण तालुक्यात पावसाच्या दीर्घ खंडामुळे दुष्काळीची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यात चांगला पाऊस व्हावा, यासाठी येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने ईदगाह मैदानावर ‘नमाज-ए-इस्तिस्का’ (विशेष पर्जन्य प्रार्थना) अदा करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने पिके करपली असून, विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तालुक्यातील दुष्काळाचे सावट दूर व्हावे आणि मुसळधार पाऊस पडावा, यासाठी मुस्लिम बांधवांनी एकत्र येत अल्लाहाच्या दरबारात आर्त प्रार्थना केली. नूरानी मस्जिदचे इमाम अबू-तलहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रार्थना सोहळा झाला. नमाजनंतर इमाम अबू-तलहा यांनी अल्लाहाच्या दरबारात हात पसरून दुआ मागताना त्यांचे डोळे पाणावले. “हे परवरदिगारा… निष्पाप बालके, मुके प्राणी आणि कष्टकरी बळीराजाचे हाल पाहवत नाहीत; तहानलेल्या धरणीवर कृपेचा पाऊस पाड’, अशी आर्त हाक त्यांनी दिली. या भावूक आवाहनाने संपूर्ण ईदगाह मैदानावर उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रू आले. या विशेष नमाजात सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केवळ स्वतःसाठी नव्हे, तर संपूर्ण तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी आणि जनतेच्या सुखासाठी व शिवारात पुन्हा समृद्धी फुलावी यासाठी ही सामुदायिक याचना करण्यात आली.
Source link
दुष्काळमुक्तीसाठी जायखेड्यात ईदगाह मैदानावर नमाज अदा:बागलाणमध्ये पिके करपली; अल्लाहाच्या दरबारात वरुणराजाला साकडे