![]()
अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ प्रत्यक्ष वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्रात ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरण तातडीने जाहीर करून त्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिर्डीत सकल मातंग समाजाच्या वतीने भव्य महामोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारने उपवर्गीकरणाबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आमदार अमित गोरखे यांनी दिला. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित जातींच्या आरक्षणात राज्यांना उपवर्गीकरण करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. पंजाब, हरियाणा आणि तामिळनाडूतील अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाशी संबंधित प्रकरणांचाही या निकालात विचार करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारनेही दिरंगाई न करता उपवर्गीकरणाचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी गोरखे यांनी केली. महामोर्चाला आमदार सुनील कांबळे, अण्णा भाऊ साठे यांचे वारस सचिन साठे, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, राजेश घोडे, प्रा. मिलिंद आव्हाड, गणपत भिसे, परिमल कांबळे, अजिंक्य चांदणे आदी उपस्थित होते. शिर्डीतील लहुजी चौकातून महामोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल मैदानावर पोहोचला. तेथे मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनातील हा ७६ वा मोर्चा असल्याचे गोरखे यांनी सांगितले. तसेच २९ सप्टेंबरला मुंबईत पुढील भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी सुसंगत असल्याचे गोरखे यांनी सांगितले. मातंग समाज कोणत्याही समाजाच्या हक्कावर गदा आणण्याची मागणी करत नसून, आपल्या न्याय्य हक्कासाठी हा लढा सुरू आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. उपवर्गीकरणामुळे इतर समाजाच्या हक्कांचे नुकसान होणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Source link
शिर्डीत सकल मातंगसमाजाचा महामोर्चा:उपवर्गीकरणाचा निर्णय घ्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू- आमदार गोरखे