Headlines

स्वप्नपूर्तीचे व्यसन बाळगा, अंमली पदार्थांना नकार द्या:आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जितेश शर्माचे तरुणांना आवाहन‎




अमरावती ग्रामीण पोलिसांच्या वतीने अमली पदार्थांच्या समूळ नायनाटासाठी राबवल्या जात असलेल्या ‘ऑपरेशन कवच’ या उपक्रमांतर्गत ‘नॉट नॉर्मल’ या लघुपटाच्या टीझरचे अनावरण शनिवारी (दि. १९) मंथन हॉल परिसरात पार पडले. या कार्यक्रमाला अमरावतीचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जितेश शर्मा याने प्रमुख उपस्थिती लावून उपस्थितांना, विशेषतः तरुणाईला मार्गदर्शन केले. यावेळी जितेशने सांगितले कि, मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवण्याचे व्यसन निश्चितच करावे, मात्र व्यसन (नशा) अंमली पदार्थांचे नको, कारण अंमली पदार्थांचे व्यसन आयुष्य खराब करुन टाकते. ग्रामीण पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन कवच’ जिल्हाभरात यशस्वीपणे राबवले जात आहे. याच उपक्रमांतर्गत ‘नॉट नॉर्मल’ हा सुमारे ४० मिनीटांचा लघूपट तयार करण्यात आला आहे. स्थानिक कलावंतानी अंत्यत दमदारपणे हा लघूपट साकारला आहे. आगामी काळात हा लघूपट प्रत्येक विद्यार्थी, नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे. कार्यक्रमात बोलताना जितेश शर्माने सर्वप्रथम पोलिस दलाच्या अथक परिश्रमांचे मनापासून आभार मानले. अंमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाधीनतेवर चिंता व्यक्त करताना जितेश म्हणाला, अंमली पदार्थांचे व्यसन (नशा) हे समाजाला आणि देशाला हळूहळू संपवणारे स्लो पॉयझन आहे. आपण लहानपणापासून ज्या मित्रांसोबत खेळलो, ते आज व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात तेव्हा वाईट वाटते. मला माझ्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार आणि मार्गदर्शन यामुळे मी या सर्व गोष्टींपासून दूर राहू शकलो. व्यसन हे पैशाचे असो किंवा भक्तीचे, ते माणसाला प्रगतीकडे नेते, परंतु अंमली पदार्थांची नशा ही माणसाला कायमची उद्ध्वस्त करते. शॉर्टकट नेहमी खाईत घेऊन जातात, तर कष्टाचा मार्गच यश मिळवून देतो. या कार्यक्रमास अप्पर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड, सहाय्यक पोलिस अधीक्षक ईशानी आनंद, सर्व पोलिस उपअधिक्षक, प्रभारी गृह पोलिस अधीक्षक किरण वानखडे, पीआय अशोक लांडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व ठाणेदार प्रामुख्याने उपस्थित होते. धोकादायक दृष्टिकोन बदलणे मुख्य उद्देश अमली पदार्थांच्या वाढत्या समस्येवर प्रभावी प्रहार करण्यासाठी ‘ऑपरेशन कवच’ अंतर्गत ‘नॉट नॉर्मल’ या विशेष लघुपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. आजच्या तरुण पिढीमध्ये व शाळकरी मुलांमध्ये व्यसनाधीनता सहज व सामान्य बाब बनत चालली असून, हा धोकादायक दृष्टिकोन बदलणे हा या लघुपटाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल युगात इन्फ्लुएन्सर्स व कंटेंट क्रिएटर्सचे लाखो फॉलोअर्स असतात, त्यामुळे अशा जनजागृतीपर मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन एसपी कदम यांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *