Headlines

पुणे फेस्टिव्हलमध्ये मराठी कवी संमेलन, बोलीभाषांच्या कवितांना प्रचंड प्रतिसाद:हास्य, मानवी संवेदना जागवणाऱ्या कवितांनी रसिकांची दाद मिळवली




पुणे फेस्टिव्हलमध्ये झालेल्या मराठी कवी संमेलनाला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हास्य, भाषेच्या गमती आणि मानवी संवेदना जागवणाऱ्या कवितांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अहिराणी, वर्‍हाडी आणि मराठवाडी बोलीतील कवितांनाही प्रचंड दाद मिळाली. हे मराठी कवी संमेलन पुणे फेस्टिव्हल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात झाले. यावेळी पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्य संयोजक अॅड. अभय छाजेड, जनरल सेक्रेटरी डॉ. सतीश देसाई, कोल्हापूरचे उपजिल्हाधिकारी हेमंत निकम, नगरसेवक सुनील शिंदे आणि मोहन टिल्लू यांसारखे मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कविता सादर करणाऱ्या सर्व कवींचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या ३२ वर्षांपासून या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन करणारे वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचे पुत्र गौरव यांचाही यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. संमेलनात राज्याच्या विविध भागांतील कवी सहभागी झाले होते. यामध्ये अमरावतीचे नितीन देशमुख, मंगळवेढ्याचे इंद्रजीत घुले, नांदेडचे नारायण पुरी, बुलढाण्याचे गोपाल मापारी, ठाण्याचे प्रशांत मोरे, फोंडा येथील शशिकांत तिरोडकर, पुण्याचे अनिल दीक्षित आणि सोलापूरचे तालिब सोलापुरी यांचा समावेश होता. शिरूरचे कवी भरत दौंडकर यांनी संमेलनाचे सूत्रसंचालन केले. कवी नितीन देशमुख यांच्या ‘पावसा छेडू नको…’ या कवितेतील ‘वेगळा काढेन मी विस्तवातून गारवा, उघडले हृदयातले श्रावणाचे दार मी’ या ओळींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. गोपाल मापारी यांच्या कवितेतील ‘कदाचित नाव गांधींचे दिले असणार मार्गाला, म्हणूनच चालणाऱ्यांची इथे गर्दी कमी आहे’ या आशयालाही प्रेक्षकांनी दाद दिली. शशिकांत तिरोडकर यांच्या ‘भेट’ कवितेतील ‘असा चिकटला पारा, की काच आरसा झाली, चौकट सावरताना प्रतिमाच निखळली होती’ या ओळींनी रसिकांना अंतर्मुख केले. नारायण पुरी यांनी आपल्या कवितेतून ‘आला नवा परिवारवाद, मतदाता बाद, दिमागी नक्सल हा झाला, आंदोलकजीवी बोला त्याला, वर्षावर चारा बहरलेला, बांधलेली ढोरं दावणीला’ असे वास्तवाचे चित्र मांडले. अनिल दीक्षित यांनी लोकशाहीवर आधारित ‘माझी कुणा म्हणू मी’ ही कविता सादर केली. सर्वसामान्यांच्या मनातील प्रश्न मांडणाऱ्या या कवितेला ‘वन्समोअर’ मिळाला. इंद्रजीत घुले यांनी ‘लग्नातलं जेवण’ या कवितेतून हास्याचे कारंजे उडवले. ‘प्रेम तिच्यावर करायचं, घराभोवती फिरायचं, एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात जेवायचं…’ या ओळींनी प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. ‘बुवाबाबांना चढलेली अध्यात्माची नशा आता उतरणार आहे, तुटणार आहे तंद्री, समाधी भंग पावणार आहे…’ या कवितेने सद्यस्थितीचे वास्तव चित्र उभे केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *